Homeदेश-विदेशNew Parliament : नवीन संसद भवनाजवळ आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

New Parliament : नवीन संसद भवनाजवळ आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

Subscribe

नवीन संसद भवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा आत्मदहनाचा प्रयत्न आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नवी दिल्ली : नवीन संसद भवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा आत्मदहनाचा प्रयत्न आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (man setting himself on fire near parliament taken to rml hospital says delhi police)

संसदेच्या जवळच एका व्यक्तीने स्वतःला आग लावत आत्मदहनाचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी याची माहिती दिली. आत्महत्येच्या प्रयत्नात ही व्यक्ती चांगलीच भाजली आहे, आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळाहून पेट्रोल जप्त करण्यात आले आहे. या प्रसंगानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. त्याची प्रकृती गंभीर आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव जितेंद्र असून तो उत्तर प्रदेशातील बागपत येथील राहणारा आहे. रेल भवन येथे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. बागपतमधील वैयक्तिक दुश्मनीचे हे प्रकरण असावे, असा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

डीसीपी देवेश कुमार महला म्हणाले की, उत्तर प्रदेशातील बागपत येथील जितेंद्र नामक व्यक्तीने हा आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने ही आग विझवली. बागपत येथे आपल्या विरोधात तक्रार दाखल केल्याप्रकरणी तो चिंतेत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन पानांची चिठ्ठी सापडली असून, ती अर्धवट जळालेली आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली असून, प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नाताळ आणि नवीन वर्ष यामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची संख्या वाढवली आहे. पोलिसांची पथके सातत्याने गस्त घालत आहेत. वाहनांची तपासणी देखील सुरू आहे.

काही अहवालांनुसार, जितेंद्र 90 टक्के भाजल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर दुर्घटनास्थळाचे जे फुटेज समोर आले, त्यानुसार जितेंद्रचे बूट आणि बॅग असे सामानही जळल्याचे दिसते आहे. दरम्यान, नाताळनिमित्ताने सुरक्षा व्यवस्था चोख असताना जितेंद्र हा पेट्रोल घेऊन रेल भवनपर्यंत पोहोचला तरी कसा, असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar