घरदेश-विदेशराम मंदिर प्रतिकृतीसाठी मंगल प्रभात लोढांची ५१ लाखांची बोली

राम मंदिर प्रतिकृतीसाठी मंगल प्रभात लोढांची ५१ लाखांची बोली

Subscribe

पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा परदेशात दौर्‍यावर जातात. तेथील नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांना भेटवस्तू देण्यात येतात. मोदींना परदेशी दौर्‍यात असंख्य मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटवस्तू स्वत:कडे न ठेवता त्यांचा लिलाव करतात. त्यातून मिळालेले पैसे पंतप्रधान मदत निधीसाठी देतात. त्यातून देशातील गोरगरिबांना अडणचीत मदत करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या अशाच भेटवस्तूंचा सध्या लिलाव सुरू आहे. त्यात राम मंदिराच्या लाकडी प्रतिकृतीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही राम मंदिराची लाकडी प्रतिकृती खरेदी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार आणि व्यावसायिक मंगल प्रभात लोढा यांनी चक्क ५१ लाख रुपयांची बोली लावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव Https://pmmementos.gov.in या वेबसाईटवर सध्या होत आहे. देश-विदेशातील अनेक मान्यवरांनी यातील वस्तू खरेदी करण्यासाठी लाखांपासून कोटी रुपयांपर्यंत बोली लावल्या आहेत. भेटवस्तूंचा लिलाव १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वेबसाईटवर होत आहे. या भेटवस्तूंमध्ये अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर, विविध मॉडेल, शिल्प, चित्रे यांचा समावेश आहे. तसेच नुकत्याच पडलेल्या टोकियो २०२० ऑलिम्पिक गेम्स आणि टोकियो २०२० पॅरालिम्पिक गेम्समधील विजेत्यांनी पंतप्रधानांना दिलेली क्रीडा उपकरणे आणि इतर भेटवस्तूंचाही त्यात समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचणार्‍या नीरज चोप्रा याने स्पर्धेत फेकलेला भालाही या लिलावात ठेवण्यात आला आहे. अशाप्रकारे १३३० स्मृतिचिन्हांचा ई-लिलाव वेबसाईटवरून करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार मंगल प्रभात लोढा यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्रतिकृतीसाठी ५१ लाख रुपयांची बोली लावली आहे. लोढा यांनी बोली लावली ती राम मंदिराची प्रतिकृती ६८ सेमी लांब, ५२ सेमी रुंद आणि ५३ सेमी उंच आहे. तसेच त्याचे वजन २३ किलो आहे. ही प्रतिकृती संपूर्णत: लाकडाने बनवण्यात आली आहे. मंगलप्रभात लोढा यांनी लावलेली ही सर्वाधिक बोली आहे. त्यामुळे त्यांना ही प्रतिकृती मिळणार हे निश्चित आहे. याबाबत मंगल प्रभात लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांना ई-लिलावाद्वारे देशाच्या सेवेत योगदान देण्याची आणखी एक संधी दिली आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -