Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश युक्रेनइतकीच मणिपूरची मनुष्यहानी महत्त्वाची, ठाकरे गटाचे मोदी सरकारवर शरसंधान

युक्रेनइतकीच मणिपूरची मनुष्यहानी महत्त्वाची, ठाकरे गटाचे मोदी सरकारवर शरसंधान

Subscribe

मुंबई : ‘जी-20’ परिषदेत मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘दिल्ली घोषणापत्र’ जारी झाले. या घोषणापत्रात युक्रेन युद्धात झालेल्या मानवी हानीबद्दल आणि युद्धामुळे जगावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली, पण अशाच प्रकारची मनुष्यहानी स्वदेशात मणिपुरात सुरू आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत, पाचशेच्या आसपास लोक मरण पावले आहेत. युक्रेनच्या मनुष्यहानीइतकीच मणिपूरची मनुष्यहानी महत्त्वाची आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाने मोदी सरकारवर शरसंधान केले आहे.

हेही वाचा – आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु…; जरांगे पाटलांच्या तब्येतीबाबत रोहित पवारांना चिंता

- Advertisement -

‘जी-20’चे आयोजन नेत्रदीपक आणि नीटनेटके झाले. रशियाचे अध्यक्ष पुतीन व चीनचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत आले नाहीत, पण त्यांचे प्रतिनिधी संमेलनात सामील झाले. ‘जी-20’ परिषदेत जारी झालेल्या ‘दिल्ली घोषणापत्रा’वर सगळ्यांची सहमती झाली. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाचा सहभाग असलेल्या बहुतेक सर्व जागतिक परिषदांमध्ये संयुक्त निवेदनावर एकमत झाले नव्हते, पण भारतातील परिषदेत रशियाचा सहभाग असूनही घोषणापत्र एकमताने मंजूर झाले, असे दैनिक सामनाच्या अग्रलेखात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

लोकशाही हा ‘जी-20’चा आत्मा आहे. महात्मा गांधी हे लोकशाहीचे जनक आहेत. ‘जी-20’ परिषदेसाठी भारतात आलेल्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदींसमवेत राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. हा भाजपावर व त्यांच्या सरकारवर काळाने घेतलेला सूड आहे. गेल्या दहा वर्षांत गांधी व गांधी विचार मारण्याचा प्रयत्न झाला, पण जगाला दाखविण्यासाठी का होईना, पंतप्रधान मोदी यांना गांधींसमोर झुकावे लागले. कारण जगाने गांधी विचार स्वीकारला आहे, अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जरांगे पाटलांचे आंदोलन मोडून काढण्याचा डाव, कारण…; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

युक्रेनवरील हल्ला हा ‘जी-20’तील चिंतेचा विषय असेल, तर भारतातील लोकशाही व स्वातंत्र्याची गळचेपी हादेखील चिंतेचा विषय ठरला पाहिजे. नाहीतर दिल्लीत जग आले, मोदींनी पंगत बसवली, पण त्या पंगतीत भारताच्या लोकशाहीचे ताट रिकामे राहिले, असेच म्हणावे लागेल, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisment -