Homeदेश-विदेशManmohan Singh : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन; 92 व्या...

Manmohan Singh : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नवी दिल्लीत 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी (26 डिसेंबर) संध्याकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक आल्याची माहिती समोर आली होती. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची एक खास टीम उपचार करत होती. ते गेल्या अनेक दिवसापासून आजारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Manmohan Singh former president of india passed away in Delhi)

हेही वाचा : BJP vs Congress : CWC सत्रात भारताचा नकाशा चुकीचा; नवी मुस्लिम लीग म्हणत भाजपची काँग्रेसवर टीका 

डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच काँग्रेसने शुक्रवारी (27 डिसेंबर) बेळगावमध्ये सुरू असलेले सर्व कार्यक्रम रद्द केले. तर, त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळताच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे दिल्लीसाठी रवाना झाले होते. दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग हे याचवर्षी एप्रिल महिन्यात राज्यसभेतून निवृत्त झाले होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गेंनी त्यांच्या संसदेतील त्यांच्या दीर्घ कारकि‍र्दीचे सढळरित्या कौतुक केले होते. दरम्यान, दिल्ली काँग्रेसने अधिकृत ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली.

कोण आहेत डॉ. मनमोहन सिंग?

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह म्हणजेच सध्या पाकिस्तानामधील पंजाब येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. डॉ. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित असून त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून आपले शिक्षण घेतले आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक म्हणूनदेखील काम केले आहे. 1976 मध्ये ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तसेच, 1985 ते 1987 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

डॉ. मनमोहन सिंग यांनी 22 मे 2004 ला भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. तर 22 मे 2009 ला ते पुन्हा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक बदल केले. तसेच त्याआधी 1991 ते 1996 या काळात पी. वी. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मनमोहन सिंह अर्थमंत्री होते. मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये उदारीकरणाच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाची मोठी आर्थिक वृद्धी झाली. या निर्णयाने भारतात परतीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आली. मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीने देशाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. डाव्या आणि उजव्यांचा विरोध असतानाही खुली अर्थव्यवस्था स्वीकारून मध्यमवर्गीयांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवणारे अर्थक्रांतिकारक डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


Edited by Abhijeet Jadhav