नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर करत माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे एम्स रुग्णालयात पोहोचले होते. (Manmohan Singh former prime minister passed away PM Modi condolance)
हेही वाचा : Manmohan Singh : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “भारतातील सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशात शोक व्यक्त करण्यात येत आहे. एक सामान्य पार्श्वभूमीतून ते एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ बनले. अर्थमंत्रीपदासह त्यांनी अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.
India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji. Rising from humble origins, he rose to become a respected economist. He served in various government positions as well, including as Finance Minister, leaving a strong imprint on our economic… pic.twitter.com/clW00Yv6oP
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2024
देशाचे माजी पंतप्रधान आणि भारताचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग म्हणून त्यांची जगभरात ओळख होती. डॉ. मनमोहन सिंग हे 1991 मध्ये पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री होते. तेव्हाच त्यांनी देशाच्या आर्थिक उदारिकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. आर्थिक उदारिकरणात शासकीय नियंत्रण कमी करणे, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन (FDI) आणि मुलभूत बदलांना प्रोत्साहन दिले होते. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठ खुली झाली होती. मनमोहन सिंग हे रुढअर्थाने राजकारणी नव्हते. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर राहिले होते. त्यानंतर अर्थमंत्री म्हणून त्यांनी नरसिंह राव सरकारमध्ये काम केले होते. त्यानंतर युपीए-एक आणि दोन असे दहा वर्ष (2004 ते 2014) ते देशाचे पंतप्रधान होते.
Edited by Abhijeet Jadhav