मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सरकारच्या आर्थिक घोटाळ्यांवर मोदी सरकारला प्रश्न विचारतात तेव्हा सरकार निरुत्तर होत असते. केंद्र सरकारने अनेक कंपन्यांचे किमान 500 कोटींचे कर्ज माफ करून जणू मलिदाच वाटला. या सर्व कंपन्या व त्यांचे मालक, भागीदार हे भाजपच्या नात्यागोत्यातील आहेत, पण प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना शंभर-सव्वाशे कोटींसाठी आत्महत्या करावी लागली. मराठी माणसाने हे विसरता कामा नये, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – भाजपाने नुसता खिसा साफ केला तरी…, संजय राऊत यांचा हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत 2020 साली देशातील 50 प्रमुख ‘विलफुल डिफॉल्टर्स’ म्हणजे कर्ज बुडव्यांबाबत प्रश्न विचारले, पण सरकारने उत्तर देण्यास नकार दिला. त्यानंतर साकेत गोखले यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेकडून कर्जबुडव्यांचा तपशील मागितला. त्यानुसार 50 कंपन्या व व्यक्तींची यादी देण्यात आली. जैन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला 1073 कोटींची कर्जमाफी देण्यात आली. शिवाय इतर 50 कंपन्यांनाही हजारो कोटींची कर्जे माफ केली, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनातील आपल्या रोखठोक सदरात नमूद केले आहे.
…तर नितीन देसाईंचे प्राणही वाचवता आले असते
भारतीय जनता पक्षाचे एक खासदार व अभिनेते सनी देओल यांनी बँकांचे 56 कोटींचे कर्ज थकवले. त्यामुळे त्यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव पुकारण्यात आला, पण बँकेने पुढच्या चोवीस तासांत तांत्रिक कारण देत लिलाव रद्द केला. त्याआधी पंधरा दिवसांपूर्वी कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना आत्महत्या करावी लागली. बँकांचे कर्ज डोक्यावर असल्याने त्यांच्या ‘एनडी’ स्टुडिओवर जप्तीची कारवाई सुरू झाली. त्या धक्क्यातून देसाई यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. कर्ज बुडवणाऱ्यांना अभय दिले जाते, पण ते भारतीय जनता पक्षाच्या आतल्या गोटातील असतील तर, नितीन देसाईंचे प्राणही वाचवता आले असते, असे सांगत त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
हेही वाचा – आम्ही देशद्रोही मग लोकांच्या मृत्यूला जबाबादार असणाऱ्यांना काय म्हणायचं? अमित ठाकरेंचा सवाल
ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाही
लोकांच्या मनात प्रचंड खदखद व संताप आहे. सरकार निवडणुका घेत नाही व ‘ईव्हीएम’, निवडणूक आयोगावरही लोकांचा विश्वास राहिलेला नाही. रिझर्व्ह बँकेला वेठीस धरून आपापल्या लोकांची हजारो कोटींची कर्जे माफ करायची व एखादा मराठी नितीन देसाई आत्महत्येस प्रवृत्त करायचे, हे सर्व सुरूच असल्याची टीका त्यांनी केली आहे.
चंद्रावर भारताचे यान उतरले ते सर्व फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच साध्य झाले, अशा थाटात भाजपाचे लोक वावरत आहेत. ब्राझिलमध्ये सध्या अशाच पद्धतीचा कारभार चालला आहे. त्यास कंटाळून लोक शेवटी रस्त्यावर उतरले. ब्राझिलची राजधानी रियो डी जिनेरियोमध्ये रस्ते, जनजीवन ठप्प झाले. लोकांनी सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवन, संसदेवर हल्ला केला. लोक का भडकले? तर सार्वत्रिक निवडणुकीचे जे निकाल लागले ते जनतेला मान्य नव्हते. हे निकाल खरे नाहीत व त्यात गोलमाल आहे. या चिडीतून लोकांनी बंड केले. ते शेवटी मोडून काढले, पण लोकांना रोखणे कठीण गेले. सहनशीलतेचा अंत झाला की दुसरे काय होणार? असा सवाल करत खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे.
हेही वाचा – अभी तो सूरज उगा है…, कविता वाचन करत पंतप्रधान मोदींकडून मिशन चांद्रयान-3चे कौतुक
लोकांचे प्रश्न तसेच आहेत. तपास यंत्रणांची हुकूमशाही वाढतच आहे. या सगळ्यावर उतारा म्हणून ‘चांद्रयान’ चंद्रावर उतरले. आता सर्व प्रश्न सुटतील. पंतप्रधान मोदींनी हे किती अचाट काम केले, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.