नवी दिल्ली : “इतिहासात तलवारीने दिल्ली जिंकली, आता सारस्वतांच्या विचारांनी दिल्ली जिंकली आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा हा संगम आहे. दिल्लीतील साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या संगमात गेले 3 दिवस साहित्यस्नान करून आपण सगळे पवित्र झालो आहोत. महाकुंभातून परत जाताना जसे आपण गंगेचे पाणी सोबत घेऊन जातो तसेच, या संमेलनातून परतताना आपण मराठी भाषेचा संवर्धनाचा वसा सोबत घेऊन जाऊया,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी झाला. या समारोपीय सोहळ्याला संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, निमंत्रक संजय नहार, उज्वला मेहेंदळे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनात एकूण 12 ठराव साहित्य महामंडळाच्या वतीने मांडण्यात आले. त्याला उपस्थितांनी हात उंचावून अनुमोदन दिले. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान सरहद, पुणे या संस्थेने या संमेलनाचे आयोजन केले होते.
हेही वाचा : Sanjay Raut : टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाचा गैरवापर केला, गोऱ्हेंविरोधात राऊतांचे उषा तांबेंना पत्र
मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासन प्रयत्नशील आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी भाषा अध्ययन केंद्र सुरू होत आहे. सर्व सरकारी कार्यालयात मराठी भाषेत व्यवहार करणे सक्तीचे करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत जागा मिळाली तर दिल्लीतही शिवसृष्टी उभी करू, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. साहित्य संमलेनाचा निधी ५० लाखांवरुन २ कोटी केला आहे. पुस्तकांचे गाव आपल्याकडे आहे. आता कवितांचे गाव साकारण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगतानाच मराठी भाषा सर्वदूर पोहचावी यासाठी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी मराठी बांधवांना केले. तसेच 98 वे साहित्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानताना 100 व्या साहित्य संमेलनाची तयारी आतापासूनच सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. त्यासाठी मी पात्र आहे की नाही माहिती नाही, मात्र हा पुरस्कार मला दिल्यामुळे काही लोकांना वाईट वाटले, ज्यांना वाईट वाटले ते माझा नेहमीच तिरस्कार करतात. मात्र त्यांचा तिरस्कारही माझ्यासाठी पुरस्कारासारखाच आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला. माझ्या हलक्यात घेऊ नका या विधानाची चर्चा होते. मात्र ते अडीच वर्षापूर्वीच्या परिस्थितीसाठी होते, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला. याचवेळी सर्वात जास्त सह्या करणारा आणि फोटोमध्ये येणारा मी मुख्यमंत्री होतो. लोकांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी फोटोत यावे लागते. मात्र आपल्या एखाद्या सहीने कुणाचा जीव वाचत असेल तर तेही केले पाहिजे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
दिल्लीत मराठी भवन उभारणार-अजित पवार
महाराष्ट्र सदनाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिवंगत प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, राष्ट्रपती भवनाच्या नंतर कुठली देखणी इमारत असेल तर ती महाराष्ट्र सदन आहे. हे सदन खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासाठी आहे. त्यामुळे दिल्लीत मराठी लोकांसाठी एक भवन उभारले जाईल, त्यासाठी अर्थसंकल्पात हवी ती तरतूद केली जाईल, असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.