नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाची चर्चा रंगली आहे. एकीकडे यासाठी शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून असणार आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही या संमेलनाचे प्रमुख अतिथी आहेत. तर, डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत होत असल्याने सर्वांचे लक्ष हे या संमेलनाकडे लागले आहे. तसेच, नवी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन हे सरहद या संस्थेकडून करण्यात येत आहे. (Marathi sahitya Sammelan 2025 PM Modi will innaugarate with Sharad Pawar and Devendra Fadnavis)
असे असेल संमेलनाचे स्वरूप
शुक्रवारी (21 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजता दिल्लीतील विज्ञान भवनात मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी यादरम्यान विविध साहित्यिक कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत. संमेलनासाठी दोन कोटींचा अतिरिक्त निधी राज्य सरकारने मंजूर करण्यात आला असून साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दरवर्षी दोन कोटींचे अर्थसहाय्य करते. पण, दिल्लीतील खर्च लक्षात घेऊन अधिक निधीची महामंडळाची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये तब्बल 71 वर्षांनी मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तसेच, शुक्रवारी (21 फेब्रुवारी) संध्याकाळी 6.30 ते 7.30 दरम्यान दुसरे उद्घाटन सत्र होणार आहे. सुशीलकुमार शिंदे, उदय सामंत, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हे सत्र पार पडणार आहे. तर, संध्याकाळी 7.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत निमंत्रितांचे कविसंमेलन असणार आहे.
साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये ग्रंथदिंडी काढण्यात आली. ही ग्रंथदिंडी संसदेपासून काढण्यात आली. संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पाहार अर्पण करून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. 1200 साहित्यिक विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे या रेल्वेमध्येही साहित्य संमेलन रंगणार असून यावेळी बोगीमध्येही वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, या रेल्वेला महापराक्रमी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात आले. दरम्यान, यावेळी अनेक मंत्री, नेते मंडळी या मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.