लैंगिक संबंधांसाठी पतीला नाही म्हणण्याचा अधिकार स्त्रीला!

दिल्ली हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण मत

coronavirus ugandans physical intimacy during quarantine tlif

स्त्रीचे लग्न झाले असले तरी लैंगिक संबंधांसाठी पतीला नाही म्हणण्याचा अधिकार त्या स्त्रीला आहे, असे महत्त्वपूर्ण मत दिल्ली हायकोर्टाने नोंदवले आहे. जर स्त्रीला तिच्या पतीकडून बळजबरीने लैंगिक संबंधांना बळी पाडले जात असेल तर तिने कायद्याचा आधार घ्यायलाच हवा, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. वैवाहिक बलात्काराला गुन्हेगार ठरवणार्‍या याचिकांवर सुनावणी करताना खंडपीठाने केवळ ती विवाहित आहे म्हणून ती ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार गमावते का, असा प्रतिप्रश्नही हायकोर्टाने उपस्थित केला आहे.

फक्त स्त्री विवाहीत आहे म्हणून तिने लैंगिक संबंधास ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार गमावला आहे का?, याचा अर्थ ५० देश ज्यांनी वैवाहिक बलात्कार हा गुन्हा ठरवला आहे, ते चुकीचे आहे का?, असा सवाल न्यायमूर्ती राजीव शकधर आणि सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने उपस्थित केला. विवाहित महिलेला वैयक्तिक कायद्यांतर्गत क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट देण्याचा पर्याय आहे आणि ती तिच्या पतीविरुद्ध आयपीसी कलम ४९८ अ (विवाहित महिलेवर क्रूरता) अंतर्गत फौजदारी खटलाही नोंदवू शकते, या दिल्ली सरकारने केलेल्या युक्तिवादाला खंडपीठाने दाद दिली नाही. कलम ३७५ च्या अपवादाने गोपनीयतेच्या, सन्मानाच्या किंवा विवाहात किंवा बाहेर लैंगिक संबंध नाकारण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही, कारण तिच्यावर कोणतीही जबरदस्ती नसते, असे सरकारी वकील नंदिता राव यांनी सांगितले होते.

भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३७५ अन्वये पतींना दिलेल्या खटल्यातील अपवादामुळे फायरवॉल तयार झाली आहे. ही फायरवॉल कलम १४ (कायद्यापुढे समानता) आणि कलम २१ (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण) चे उल्लंघन करत आहे की नाही हे कोर्टाला पहावे लागेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.