नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीचे योगदान खूप महत्त्वाचे मानले जाते. अशामध्ये उत्तर प्रदेशचे बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी त्याच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, “मोहम्मद शमीने रमजानमध्ये रोजा केला नाही, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान एनर्जी ड्रिंक पिताना दिसला. त्याने जाणीवपूर्वक रोजा ठेवला नाही, जो गुन्हा आहे, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार आहे.” असे म्हणत टीका केली आहे. तसेच, यावर मोहम्मद शमी याचा भाऊ मोहम्मद जैदने प्रत्युत्तर दिले आहे. फक्त टीआरपी मिळवण्यासाठी असे विधान केली असल्याची टीका यावेळी शमीच्या भावाने केली.
हेही वाचा : Champions Trophy 2025 : यजमान पाकिस्तानचे आव्हान सहा दिवसांत तर, देशातील सामने 15 दिवसांत आटोपले
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक पिताना दिसत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील सामन्यातील हा व्हिडीओ असून यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलेली दिसली. अशामध्ये काहींनी या गोष्टीविरोधात त्याच्यावर टीका केली. तर, काहींनी ‘खेळला जात धर्म नसतो,’ असे म्हणत त्याची पाठराखण केली. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी एक निवेदन जारी करण्यात आले. ‘इस्लामने रोजा करणे कर्तव्य म्हणून घोषित केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून रोजा केला नाही तर तो मोठा पापी आहे. रोजा हे कर्तव्य असूनही मोहम्मद शमीने उपवास केला नाही. शमीने उपवास न ठेवता मोठा गुन्हा केला आहे, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार आहे.’ असे या निवेदनात म्हटले आहे.
यावरून मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद जैदने मौलानांना प्रत्युत्तर दिले आहे. तो म्हणाला की, “मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी मोहम्मद शमीबाबत जे विधान केले, ते हास्यास्पद आहे. मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी फक्त टीआरपी मिळवण्यासाठी असे विधान केले. मला वाटते की, या मौलाना यांनी हे पद मिळवण्यासाठी काही धार्मिक ग्रंथ नक्कीच वाचले असतील, पण त्यांच्या वक्तव्यावरुन पण तसे दिसत नाही. कारण जर कोणी व्यक्ती एका व्यक्तीच्या अधिपत्याखाली काम करत असेल किंवा जर आपला संघ खेळत असेल, देशाबाहेर जात असेल तर त्या व्यक्तींना रोजामधून सुट देण्यात येते. मौलाना यांनी आपला धर्म सर्वप्रथम जाणून घ्यावा. पण माझ्यामते मौलाना यांना या गोष्टींशी काही घेणेदेणे नसावे.” असे म्हणत त्यांची बोलती बंद केली.