Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश मीडिया ट्रायलचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, सरन्यायाधीशांनी केले सावध

मीडिया ट्रायलचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, सरन्यायाधीशांनी केले सावध

Subscribe

नवी दिल्ली : मीडिया ट्रायलमध्ये एक असे चित्र निर्माण होते, ज्यात न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच एखाद्या व्यक्तीला लोकांच्या नजरेत गुन्हेगार बनवली जाते. म्हणूनच मीडिया ट्रायलचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असे भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बुधवारी सांगितले. जबाबदार पत्रकारिता ही सत्याच्या दीपस्तंभासारखी असते, जी आपल्याला चांगल्या उद्याचा मार्ग दाखवू शकते, असेही ते म्हणाले.

सरन्यायाधीश चंद्रचूड हे एका पुरस्कार सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. मीडिया ट्रायलच्या धोक्यांवर ते म्हणाले, आमच्या व्यवस्थेतील प्रमुख समस्यांपैकी एक म्हणजे मीडियाद्वारे घेतली जाणारी ट्रायल हा आहे. जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष असते. कायदेशीर प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा पैलू आहे. तथापि, न्यायालयाने दोषी ठरवण्याआधीच लोकांच्या नजरेत एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवणारे तर्क माध्यमांनी तयार मांडल्याची उदाहरणेही आहेत. यामुळे संबंधितांच्या जीवनावर तसेच योग्य प्रक्रियेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असे सरन्यायाधीश म्हणाले. सोशल मीडिया अनेक प्रकारे पत्रकारांसाठी बदल घडवून आणणारे माध्यम ठरले आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना स्वतःचे चॅनेल सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीला पुढे नेणाऱ्या इंजिनासारखी आहे. तसेच ती सत्य, न्याय आणि समानतेच्या शोधावर आधारित असते. एकीकडे डिजिटल युगातील आव्हानांना सामोरे जात असताना, दुसरीकडे पत्रकारांनी त्यांच्या वृत्तांकनात वस्तुनिष्ठता, निष्पक्षपणा आणि उत्तरदायित्वाचे भान कायम राखणे अधिक महत्त्वाचे बनते, असे त्यांनी सांगितले. माध्यम संस्थांकडे वैविध्यपूर्ण आणि सर्वांना प्रतिनिधीत्व देणारे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. ज्यात विविध दृष्टीकोन आणि भूमिकांसह चांगल्या प्रकारे संशोधन केलेल्या बातम्या असल्या पाहिजेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

- Advertisement -

विधिविषयक पत्रकार कायद्यातील गुंतागुंतीवर प्रकाश टाकून न्यायालयीन व्यवस्थेची माहिती ते लोकांपर्यंत पोहोचवतात, असे सांगून सरन्यायाधीस म्हणाले, मात्र, न्यायाधीशांची भाषणे आणि निवाडे यांचे निवडक प्रकारे उल्लेख करणे ही चिंतेची बाब आहे. अशा प्रकारच्या वृत्तांकनातून महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यांबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची प्रवृत्ती आहे.

- Advertisment -