भाजपचा ‘गल्ली बॉय’; ‘कमल कमल कमल’ सोशल मीडियावर ट्रोल!

मीरतच्या एका भाजप नेत्याचा प्रचार सभेतल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत असून सोशल मीडियावर ट्रोलिंग होत आहे.

Vineet Sharda Kamal Kamal Kamal
विनीत शारदा कमल कमल कमल व्हिडिओ ट्रोल

निवडणुकांच्या काळाच जशी राजकीय नेत्यांची पल्लेदार, अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषणं प्रसिद्ध होतात, तशीच भाषणात अजब पद्धतीनं बोलणाऱ्या नेत्यांच्या ऑडिओ-व्हिडिओ क्लिपदेखील भलत्याच व्हायरल होतात. आत्तापर्यंत बोलण्याच्या लकबीमुळे व्हायरल होणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले, रिपाइंचे रामदास आठवले, स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे अशी राज्यातल्या नेत्यांची नावं घेतली जात होती. आता त्यामध्ये आणखी एक नाव समाविष्ट झालं आहे. नव्हे, या सगळ्या नावांच्या वर हे नाव जाऊ शकतं. आणि ते नाव आहे भाजपचे मीरतमधले नेते विनीत शारदा. सध्या त्यांची ‘कमल कमल कमल’ व्हिडिओ क्लिप भलतीच व्हायरल होऊ लागली आहे. त्यावर शारदा यांना ट्रोल देखील केलं जाऊ लागलं आहे! हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी देखील ‘हा भाजपचा स्वत:चा गल्ली बॉय’ म्हणत उपहासात्मक ट्वीट केलं आहे.

मुफ्ती यांच्या ट्वीटनंतर ट्विटरीट पब्लिक या गल्लीबॉयवर तुटूनच पडले! प्रत्येकानं आपापल्या परीनं शारदा यांच्या क्रिएटिव्हिटीवर ट्रोलिंग सुरू केलं. त्यामुळे भाजपचं कमळ नसून शारदांचं कमल आता प्रचारात भलतंच फेमस व्हायला लागलं आहे.