वेळेत निवडणुका न झाल्याने जागतिक कुस्ती महासंघा (युनायटेड वर्ल्ड रेसलिंग)ने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले आहे. निवडणुका वेळेत घेण्यासाठी जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाला अनेकदा ताकीद दिली होती. तरीही भारतीय कुस्ती महासंघ वेळेत निवडणुका घेण्यास अपयशी ठरले. परिणामी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धांमध्ये भारतीय ध्वजाखाली भाग घेता येणार नाही. जागतिक कुस्ती महासंघाने ३० मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पत्र लिहून ४५ दिवसांत (१५ जुलैपर्यंत) भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक न घेतल्यास सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा दिला होता.
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यासह महासंघाच्या सदस्यांना क्रीडा मंत्रालयाने निलंबित केले होते. त्यानंतर अॅडहॉक समिती स्थापन करून जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी न्यायााधीश एम.एम.कुमार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका या ११ जुलै रोजी घेण्याचे ठरवण्यात आले, परंतु आसाम कुस्ती महासंघाने आपल्या मान्यतेसाठी आसाम उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे या निवडणुकीवर स्थगिती आली. त्यानंतर अॅडहॉक समितीने आसाम कुस्ती महासंघाला मान्यता दिली. या निवडणुकीसाठी नव्याने १२ ऑगस्ट ही तारीख ठरवण्यात आली, परंतु यावेळेस दिपेंद्र हुड्डा यांच्या समर्थनार्थ हरियाणा कुस्ती महासंघाने निवडणुकांवर स्थगिती आणणारी याचिका हरियाणा उच्च न्यायालयामध्ये दाखल केली. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजीदेखील या निवडणुका रद्द करण्यात आल्या.
कुस्ती महासंघाच्या १५ जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्यासह आणखी ४ जणांनी अर्ज केला होता.