मध्यावधी निवडणुका ट्रम्प यांची डोकेदु:खी वाढवणार?

मंगळवारी अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान झाले. यावेळी झालेल्या मतदानावरून ट्र्म्प यांची पुढील दोन वर्षे कशी असणार हे स्पष्ट होणार आहे.

donald trump invited by india

मंगळवारी अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणुकांसाठी मतदान झाले. यावेळी मोठ्या संख्येनं मतदारांनी मतदान केले. दरम्यान, मोठ्या प्रमाणात झालेले मतदान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची डोकेदु:खी ठरणार अशी चर्चा सध्या अमेरिकेमध्ये सुरू आहे. अध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय सध्या वादात सापडले आहेत. त्यावरून अमेरिकेतील नागरिकांमध्ये काही प्रमाणामध्ये नाराजी देखील आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या मतदानाचे कौल हाती आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पुढील दोन वर्षे कशी जातील? याचा देखील अंदाज येणार आहे. कारण अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाल हा चार वर्षाचा असतो. अमेरिकेतील ५० पैकी ३५ राज्यामध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजता मतदानाला सुरूवात झाली. मध्यावधी निवडणुकांकडे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी आव्हान म्हणून पाहिले जाते. हिलरी क्लिंटन यांनी देखील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभाराला अमेरिकेतील जनता कंटाळली आहे. अमेरिकेच्या नागरिकांची ‘आत्ता बस झालं’ अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांच्याविरोधात असल्याचं हिलरी क्लिंटन यांनी म्हटलं आहे.

क्लिंटन यांचं मतदारांना आवाहन

मध्यावधी निवडणुकीमध्ये हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला, भ्रष्टाचारी आणि धर्मांध लोकांना मत देऊ नका असं आव्हान त्यांनी केलं. यावेळी ट्रम्प यांनी जनतेच्या दरबारात भरपूर मतदान करा असं आव्हान केलं. सिनेट आणि प्रतिनिधी सभेमध्ये सध्या रिपब्लिकन पार्टीचं बहुमत आहे. प्रतिनिधी सभेमध्ये रिपब्लिकन पार्टीचे ४३५ पैकी २३५ सभासद आहेत. पण, आता मध्यावधी निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या पारड्यात किती मतं पडतात हे निकालाअंती स्पष्ट होईल. शिवाय, ट्रम्प यांचा पुढील कार्यकाळ कसा असेल? हे देखील या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.