घरCORONA UPDATEरस्तावरच तिने मुलीला जन्म दिला, त्यानंतर २१० किमी अंतर पायी चालून गाव...

रस्तावरच तिने मुलीला जन्म दिला, त्यानंतर २१० किमी अंतर पायी चालून गाव गाठले

Subscribe

नाशिकहून चार मुलांसहीत गर्भवती महिला कामगार मध्य प्रदेशला चालत निघाली होती.

लॉकडाऊन वाढत चालल्यामुळे स्थलांतरीत कामागारांमध्ये चलबिचल वाढायला लागली आहे. त्यामुळे अनेक कामगार आपल्या गावी पायी चालत निघाले आहेत. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात पायी जाणाऱ्या एका ३० वर्षीय महिला कामागाराची रस्त्याच्या कडेलाच प्रसुती झाली. बडवानी जिल्ह्याच्या सेंधवा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. आई आणि मुलीची तब्येत चांगली असून हे त्या महिलेचे पाचवे अपत्य असल्याचे सांगितले जाते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील एका गावात कामासाठी गेलेले सतनाचे हे मजूर पायी परतत होते. ज्यामध्ये शकुंतला नावाची एक ३० वर्षीय गर्भवती महिला देखील होती. पती आणि चार मुलांसहीत ही महिला देखील पायीच आपल्या गावाला निघाली होती. मात्र नाशिक पासून धुळेपर्यंत पोहोचल्यानंतर या महिलेला प्रसवकळा यायला लागल्या. त्यानंतर सोबत असलेल्या इतर महिलांनी वाटेतच साड्यांचा तंबू बनवून शकुंतलेचे बाळंतपण केले. शकुंतलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

- Advertisement -

पोलिसांनी सांगितले की, मध्य प्रदेशपर्यंतचा प्रवास खूप मोठा होता. त्यामुळे डिलीव्हरीच्या केवळ एक तासानंतरच ही महिला पाचही मुलांसहीत आपला पती राकेशसोबत पुन्हा पायी चालायला लागली. मुलीला जन्म दिल्यानंतर तिने २१० किलोमीटरचे अंतर पायी कापले आणि अखेर शनिवारी ती मध्य प्रदेशला पोहोचली.

यावेळी महाराष्ट्र सीमेतून मध्य प्रदेशमध्ये आलेल्या मजुरांसाठी लावलेल्या मेडिकल कँम्पमध्ये सर्वांना तपासले जात होते. त्यावेळी या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी इत्थंभूत चौकशी केल्यानतंर हा सर्वप्रकार समोर आला. पोलिसांनी शकुंतला, तिचा पती आणि पाचही मुलांना एकलव्य वसतिगृहात निवारा दिला आहे. तिथे त्यांनी आराम केला. त्यानंतर त्यांना बसने त्यांच्या गावी सोडण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -