सलाम कप्तान! हावडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची सुखरुप प्रसूती!

delivery in howrah express

भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असणाऱ्या दोन महिला डॉक्टरांनी हावडा एक्स्प्रेसमध्ये प्रसूतीकळा सुरू झालेल्या एका गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती केली आहे. या एक्स्प्रेसमध्ये प्रसूती झालेली माता आणि बाळ हे दोन्हीही सुखरुप असल्याची माहिती भारतीय सैन्याच्या ट्विटर अकाऊंटवर देण्यात आली आहे. शनिवारी एक गर्भवती महिला हावडा एक्प्रेसमध्ये चढली. या महिलेला चालत्या ट्रेनमध्येच अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. पण, या महिलेचं नशीब चांगलं होतं. सुदैवाने त्याच ट्रेनमध्ये भारतीय सैन्याच्या दोन महिला डॉक्टर प्रवास करत होत्या. त्या महिलेला या दोन्ही डॉक्टरांनी तातडीने मदत करत तिची यशस्वी प्रसूती केली.

बाळ आणि माता सुखरूप!

भारतीय लष्कराच्या अतिरिक्त माहिती महासंचालनालयाने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, “लष्करातील १७२ सैन्य रुग्णालयाच्या कॅप्टन ललिता आणि कॅप्टन अमनदीप यांनी एका महिलेची यशस्वी प्रसूती केली. या महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. बाळ आणि माता दोघेही सुखरुप आहेत.” असा मजकूर टाकत भारतीय सैन्याकडून ट्रेनमधील त्या बाळाचा फोटोही ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या ट्विटनंतर कॅप्टन ललिता आणि अमनदिप या दोघींवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.