लखनऊ : लखनऊ येथील चारबाग रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेशच्या सरकारमधील एका मंत्र्याने अंतरंगी कारनामा केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे पशुधन मंत्री धर्मपाल सिंह यांनी ट्रेन सुटू नये, याकरिता थेट त्यांची गाडीच रेल्वे स्थानकावर आणली. ज्यानंतर रेल्वे स्थानकावर उपस्थित असणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडाला. या मंत्रीमहोदयांना ज्या ट्रेनने प्रवास करायचा होता, त्या ट्रेनच्या सुटायची वेळ झाली होती. ज्यामुळे या मंत्र्यांनी अपंग प्रवाशांची ज्या मार्गाने ने-आण करण्यात येत थेट तिथूनच गाडी प्लॅटफॉर्मवर आणली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Minister Dharampal Singh’s car was brought to the platform to avoid missing the train)
हेही वाचा – UWW Vs WFI: भारतीय महासंघाचं सदस्यत्व रद्द; युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा निर्णय
पशुधन मंत्री धर्मपाल सिंह हे काल बुधवारी (ता. 23 ऑगस्ट) लखनऊ ते बरेली हावडा-अमृतसर पंजाब गाडी क्रमांक 13005 या ट्रेनने प्रवास करणार होते. पंजाब मेल चारबाग स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आली होती. अशा परिस्थितीत मंत्री धर्मपाल सिंह यांना मुख्य पोर्टिकोमध्ये आल्यानंतर फारसे चालावे लागले नाही, म्हणून त्यांची गाडी थेट प्लॅटफॉर्म क्रमांक 1ला लागून असलेल्या एस्केलेटर असलेल्या प्लॅटफार्मसमोरील दिव्यांगांसाठी बनवलेल्या रॅम्पवर नेण्यात आली.
#Lucknow: Minister Dharampal Singh rammed his car till the platform of the station when he was late in catching the train. Due to this, there was chaos on platform number 1 of Charbagh station in Lucknow.#DharmpalSingh #Charbhagh@samajwadiparty
@AamAadmiParty
@yadavakhilesh pic.twitter.com/bSGT4aG9EN— Abhimanyu Indian (@Abhi321997) August 24, 2023
मंत्र्यांची गाडी आल्यानंतर प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. ते निघेपर्यंत मंत्र्यांची गाडी अडवून ठेवण्यात आली होती. नियमांनुसार, रॅम्प असताना केवळ पादचारीच एस्केलेटर वापरू शकतात. परंतु, जीआरपीने मंत्र्याना त्रास होऊ नये यासाठी आणि त्यांना गाडी पकडता यावी यासाठी नियम मोडले.
यासंदर्भात मंत्र्यांना फोन केला असता त्यांनी या घटनेतून काढता पाय घेत बोलण्यास नकार दिला. याबाबत जीआरपीचे निरीक्षक संजय खरवार यांनी सांगितले की, मंत्री धर्मपाल सिंह हे ट्रेन सुटण्याच्या वेळी स्टेशनवर पोहोचले. या कारणास्तव, त्यांच्या कारची रॅम्पवरून एस्केलेटरपर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. धर्मपाल हे याआधी बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरले आहेत. परंतु आता या मंत्रीमहोदयांनी स्वतःच्या सोयीसाठी थेट प्रवाशांची गैरसोय करत त्यांना नाहक त्रास दिल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.