संसदेत गोंधळ घालून कामकाज रोखणाऱ्या खासदारांना २ वर्ष निलंबित करा, रामदास आठवलेंची मागणी

सलग ४ दिवसांपेक्षा जास्त काळ गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा कायदा करण्यात यावा

Ramdas Athawale demands suspension of MPs for 2 years who do chao in parliament

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून सध्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. पहिल्या आठवड्यात संसदेचं कामकाज केवळ ४ तास झाले आहे. महागाई, कोरोना, पेगॅसस प्रकरणावरुन विरोधकांनी संसदेत हल्लाबोल केला आहे. यामुळे संसदेचे कामकाज तहकूब केल्यामुळे अधिक वेळ वाया गेला आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. जे खासदार संसदेत गोंधळत घालत असून संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा आणत आहेत अशा खासदारांना २ वर्षे निलंबित करण्यात यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

रामदास आठवले यांनी ट्विट करत खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. संसदेत जे खासदार सलग तीन दिवस गोंधळ घालून चौथ्या दिवशीही संसदेत गोंधळ घालून कामकाज रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम करण्यात यावा. सरकार पक्षाचा खासदार असो अथवा विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांना हा नियम लागू करावा असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रामदास आठवले यांनी म्हटलं आहे की, संसदेचे कामकाज रोखणे अक्षम्य गुन्हा आहे. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवून देशाचा पैसा वाया जातो. संसदेचे कामकाज रोखल्यामुळे देशाचे नुकसान होते. त्यामुळे सलग ४ दिवसांपेक्षा जास्त काळ गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा कायदा करण्यात यावा अशीही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मेला होणार

देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये खेला होणार नाही. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सत्तेचा मेळा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे ममता बॅनर्जी यांच्यानं होणार नाही. पुन्हा २०२४ मध्ये लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुमताने विजयी होईतील आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.