ज्यांनी उपराष्ट्रपतीपदाचा सर केलाय गड त्यांचं नाव धनकड; रामदास आठवलेंच्या कवितेनं सभागृहात हास्यकल्लोळ

बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. कर्नाटक सीमा वादामुळे अधिवेशनाची सुरुवात वादळी होणार होती. मात्र उप राष्ट्रपती जगदीप धनकड यांनी पहिल्यांदाच उप सभापती म्हणून संसदेचे काम पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उप राष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या कार्याची आठवण करुन देणारे भाषण केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाषण केले. 

Ramdas athavale
रामदास आठवले

नवी दिल्ली: ज्यांनी उपराष्ट्रपती पदाचा सर केला आहे गड त्यांचं नाव धनकड, या केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या कवितेतील ओळींनी संसदेत बुधवारी एकच हास्यकल्लोळ झाला.

बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. कर्नाटक सीमा वादामुळे अधिवेशनाची सुरुवात वादळी होणार होती. मात्र उप राष्ट्रपती जगदीप धनकड यांनी पहिल्यांदाच उप सभापती म्हणून संसदेचे काम पाहिले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उप राष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या कार्याची आठवण करुन देणारे भाषण केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाषण केले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास कवितेच्या स्टाईलमध्ये भाषण केले. त्यांनी खास उप राष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यावर कविता केली. ते म्हणाले, मी अन्यायाविरोधात लढलो आहे, म्हणून तर तुमचे अभिनंदन करण्यासाठी येथे उभा आहे. तुमचा अनुभव फार मोठा आहे, म्हणून तुम्ही संघर्षाचा पहाड चढला आहे. माझ्या पार्टीचा मी आहे एकला आणि माझ्या हाती आहे संविधानाचा पेला, मी तर आहे तुमचा सच्चा चेला, म्हणून मला नका सोडू एकला. ज्यांनी उपराष्ट्रपती पदाचा सर केला आहे गड त्यांचं नाव धनकड.

आपल्याला मिळून उखडायची आहे विषमतेची जड, यामध्ये नक्कीच यशस्वी होतील धनकड. सभागृहात जे सदस्य करतील ‘फ्रॅक्शन’ त्यांच्यावर व्हायला हवी कडक अॅक्शन, आपल्याला तर मजुबत करायचा आहे भारत नेशन, गोंधळ घालण्याची आपल्याला नकोय फॅशन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कवितेने संसदेत एकच हशा पिकला.

 मंत्री आठवले पुढे म्हणाले, मला विचारलं जातं की तुमच्या पार्टीचा एकही सदस्य लोकसभेत नाही, तरीही तुम्ही मंत्री कसे? तर मी म्हणालो की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन विचारा. मी कसा काय मंत्री आहे. मी एकटाच आहे. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण देशभर आहेत. जर तुम्ही मला जास्त बोलू दिलं तरच मी कविता ऐकवेन नाहीतर एकही कविता ऐकवणार नाही.