देशात कोळसा संकटाची ‘ही’ आहेत कारणे

देशात कोळसा संकट निर्माण झाल्याने काही राज्यांमध्ये ब्लॅक आऊट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणाला वीज पुरवणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ३३३० मेगावॅट क्षमता असलेले १३ संच बंद पडले आहेत. यामुळे गेले काही दिवस राज्यात लोड शेडींगबरोबरच ब्लॅक आऊट होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या कोळसा संकटाची नेमेकी कारणे काय आहेत हे जाणून घेणेही महत्वाचे आहे.

कोळसा मंत्रालयाने याचपार्श्वभूमीवर कोळशाचे संकट निर्माण का झाले याची माहिती दिली आहे. सप्टेंबर महिन्यात कोळशाच्या खाणीजवळील परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे खाणीतून कोळसा काढण्याबरोबरच त्याचा पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. यामुळे खाणीतून अपेक्षित कोळसा काढता आला नाही.

कोळसा मंत्रालयाने दिलेल्या दुसऱ्या कारणानुसार गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळशाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे एवढ्या चढत्या दराने कोळसा खरेदी करणे अनेक कंपन्याना कठीण झाले आहे.

तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वकाही अनलॉक करण्यात आले. यामुळे दिड वर्ष बंद पडलेल्या कंपन्या आणि व्यवसाय पुन्हा सुरू झाले. यामुळे कोळशाची मागणी वाढली. मागणीनुसार पुरवठा होत असल्याने कोळशाच्या किंमतीतही वाढ झाली. यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यातील ताळमेळ बिघडला.

तसेच गेल्या काही दिवसात सरकारने २ कोटी ८२ लाख घरांमध्ये वीज दिली. या घरांपर्यंत वीज पोहचवण्यासाठीही सरकारला बरीच कसरत करावी लागली. अशी कारणे कोळसा मंत्रालायने दिली आहेत. कोळसा संकटामुळे अनेक राज्यांनी ब्लॅकआऊट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर, गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी आणि उर्जा मंत्री आरके सिंह यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर कोळसा संकटामुळे राज्यांना ब्लॅक आऊट करण्याची वेळ येईल अशी परिस्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच औष्णिक वीज निर्मिती केंद्राला कोळशाचा पुरवठा केला जाईल असे स्पष्ट केले आहे.