‘त्या’ दृष्यांवरून केंद्र सरकारकडून वृत्तवाहिन्यांना चपराक; महिला-बालकांवर होतोय विपरित परिणाम

Ministry of information and broadcast | असे दृष्य सोशल मीडियावरून घेतले जातात, यामध्ये काहीही बदल केले जात नाहीत. यामुळे संपादकीय नियमांचं उल्लंघन होत असल्याचंही मंत्रालयाने सांगितलं आहे.

news channels

Ministry of information and broadcast | नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांमधून हिंसा, अत्याचार, हत्या आदींची स्पष्ट दृष्य दाखवली जात आहे. यामुळे महिला आणि मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करत सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने (Ministry of information and broadcast) वृत्तवाहिन्यांना (TV Channels) चपराक लगावली आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायद्यांतर्गत दिलेल्या प्रोग्राम कोडचे पालन करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत.

सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने विचलित, आक्षेपार्ह आणि अस्वस्थ करणारी दृष्य वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यास सक्तीने मनाई केली आहे. रक्त, मृतदेह आणि हिंसेसारखी दृष्य अस्वस्थ करणारी असतात, त्यामुळे महिला आणि मुलांवर विपरीत परिणाम होत आहे, असं सूचना आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडून नमूद करण्यात आलं आहे.

वृत्तवाहिन्यांवरून अपघात, घातपातांचे जे व्हिडीओ दाखवले जातात, त्यात कोणत्याही प्रकारचे एडिटिंग केले जात नाही. असे दृष्य दाखवताना ते ब्लर करण्याचे नियम आहेत. मात्र, वृत्तवाहिन्यांकडून हे नियम पायदळी तुडवले जातात. तसंच, असे दृष्य सोशल मीडियावरून घेतले जातात, यामध्ये काहीही बदल केले जात नाहीत. यामुळे संपादकीय नियमांचं उल्लंघन होत असल्याचंही मंत्रालयाने सांगितलं आहे.


या घटनांवर लगावली चपराक

  • ३० डिसेंबर रोजी ऋषभ पंत याचा अपघात झाला होता. त्याचे अपघाताचे फुटेज जसेच्या तसे दाखवण्यात आले होते.
  • २८ ऑगस्ट रोजी एक व्यक्त मृतदेह फरफटत घेऊन जात असल्याचा व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाला होता.
  • ६ जुलै रोजी एक शिक्षक ६ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करत होता. बिहारमधील हा व्हिडीओ वृत्तवाहिन्यांनी काहीही ब्लर न करता वापरला.
  • ४ जून रोजी एका पंजाबी गायकाच्या मृतदेहाचे फोटोही वृत्तवाहिन्यांवरून दाखवण्यात आले होते.
  • २५ मे रोजी आसामच्या चिरांग जिल्ह्यात एका व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीला लाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती.