भयानक! PUBG वर मैत्री झालेल्या मित्रांनीच तिच्यावर सामुहिक बलात्कार केला!

woman gang raped
प्रातिनिधिक छायाचित्र

ऑनलाईन गेमिंगमध्ये हळूहळू व्यसनाप्रमाणे पसरू लागलेल्या PUBG गेमवर नुकतीच भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या पबजीमुळेच एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर भयानक प्रसंग ओढवल्याची घटना भोपाळमध्ये उघड झाली आहे. पबजी खेळताना झालेल्या मित्रांनी या अल्पवयीन मुलीवर दीड महिना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीने तिच्या आईसोबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला असून पोलिसांन तिघा आरोपी मुलांना अटक केली आहे. हे तिघे आरोपी २० वर्षांच्या आतले आहेत. मुलीने तक्रारीत केलेल्या आरोपांच्या आधारावर या तिघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे ऑनलाईन क्राईमचं एक नवं रूप सगळ्यांसमोर आल्याचं बोललं जात आहे.

नक्की घडलं काय?

PUBG वर बंदी घालण्यापूर्वी तरूणाईला या गेमनं वेड लावलं होतं. पीडित अल्पवयीन मुलगी देखील पबजी खेळत असे. पबजीवरच तिची तिघा आरोपींशी ओळख झाली. दोन महिन्यांपूर्वी पबजीवर भारतात बंदी घालण्यात आली. मात्र, त्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिघा आरोपींनी पीडित मुलीला रंभा नगर परिसरात एका ठिकाणी भेटायला बोलावलं. जेव्हा पीडिता तिथे पोहोचली, तेव्हा तिघा आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. एवढंच नाही, तर त्यांनी या दुष्कृत्याचा व्हिडिओ देखील शूट केला. हाच व्हिडिओ जाहीर करण्याची भिती दाखवून या तिघांनी पीडितेवर पुढचा दीड महिना वारंवार बलात्कार केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..

पीडितेच्या आईला अचानक मुलीच्या वागणुकीत बदल दिसले. संशय आल्यामुळे आईने विचारणा केल्यानंतर पीडितेने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. अखेर आईसोबत पीडितेने तिघा आरोपींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश झाला. या तिघांवर भादंविच्या कलम ३७६ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.