नवी दिल्ली : विरोधकांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा आज तिसरा दिवस आहे. काँग्रेसचे आसाममधील खासदार गौरव गोगोई यांनी 26 जुलैला लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर 8 आणि 9 ऑगस्ट या दोन दिवशी या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तर आज या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी विरोधकांनी मांडलेल्या या अविश्वास प्रस्तावावर नेमके काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण आता या अविश्वास प्रस्तावाला NDA मधील म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या एका घटक पक्षाकडून पाठिंबा देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खासदार लालरोसांगा यांच्याकडून देण्यात आली आहे. (Mizo National Front, a constituent party in the NDA, will support the no-confidence motion)
हेही वाचा – कलावतींनी केली अमित शहांची पोलखोल, म्हणाल्या – “मोदी सरकारमुळे काहीच मिळालं नाही…”
मिझोराममधील नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स (NEDA) या सत्ताधारी पक्षाचा भाग असलेला मिझो नॅशनल फ्रंट (MNF) केंद्रातील मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणार आहे, असे लालरोसांगा यांच्याकडून सांगण्यात आले. मणिपूर सरकार आणि शेजारील राज्यांमध्ये जातीय हिंसाचासार रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आम्ही सरकारला विरोध करणार आहोत, असे म्हणत मिझो नॅशनल फ्रंटकडून या प्रस्तावाला पाठिंबा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत बोलताना लालरोसांगा म्हणाले की, मी विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाचं समर्थन करणार आहे पण याचा अर्थ असा नाही की मी काँग्रेसचे समर्थन करतो आहे आणि भाजपच्याविरोधात जात आहे. पण मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचाराची स्थिती नियंत्रणात आणण्यात केंद्र तसेच राज्य सरकार असमर्थ ठरले आहे. त्यामुळे याला आपला विरोध दर्शवण्यासाठी मी याचे समर्थन करणार आहे. तसेच, हिंसाचारग्रस्त मणिपूरात जातीय संघर्षाच्या स्थितीमुळे खूपच बिकट स्थितीत आहे. याबाबत मिझो नॅशनल फ्रन्ट पक्षाचे अध्यक्ष जोरमथांगा, मिझोरामचे मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांसोबत मी चर्चा केली. त्यानंतर अविश्वास प्रस्तावाचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचप्रमाणे, एमएनएफचे राज्यसभेचे खासदार वनलालवेना यांनी कायमच मणिपूरच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. इथल्या परिस्थितीवर तोडगा निघेपर्यंत मी कायम संसदेत आवाज उठवत राहणार असल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे आता या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात किती मतदान होते, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.