मोदी सरकार २० सरकारी कंपन्या विकणार; या ६ कंपन्या तात्काळ बंद

Indian Public Sector closed
प्रातिनिधिक छायाचित्र

आर्थिक विवंचणेतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने निर्गुंतवणूकीचा पर्याय समोर ठेवून चलन गोळा करण्याचा निर्णय घेतलेला आहेच. या दिशेने आता सरकार काही कठोर पाऊले उचलणार आहे. चालू आर्थिक वर्षात २० कंपन्यामध्ये निर्गुंतवणूक करुन २.१० लाख कोटींचे चलन उभे करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. यामध्ये सरकारी कंपन्यांत निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून १.२० लाख कोटी उभे करण्याचे नियोजन आखले जात आहे. तसेच वित्तीय संस्थेतील सरकारची भागीदारी विकून त्यातून ९० हजार कोटी जमा करण्याचेही लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मोदी सरकार ज्या ६ कंपन्या बंद करणार आहे, त्यामध्ये हिंदुस्तान फ्लूरोकार्बन लिमिटेड (HFL), स्कूटर्स इंडिया, भारत पंप्स अँड कम्प्रेसर्स लिमिटेड, हिंदुस्तान प्रीफैब, हिंदुस्तान न्यूजप्रिंट आणि कर्नाटक अँटीबायोटिक्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी निर्गुंतवणुकीच्या बाबतीत माहिती दिली. लोकसभेत बोलत असताना त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार पब्लिक सेक्टरमधील २० कंपन्या आणि त्यातील काही युनिट्सची भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. यातील कंपन्यांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने निर्गुंतवणूक केली जाईल. तसेच यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले की, ६ सरकारी कंपन्यांना बंद करण्यात येणार आहे. निती आयोगाने सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्यासाठी काही अटी-शर्ती ठेवलेल्या आहेत. त्या आधारावर २०१६ पासून आतापर्यंत ३४ प्रकरणांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्गुंतवणुकीला परवानगी देण्यात आलेली आहे.

हिंदुस्तान फ्लूरोकार्बन लिमिटेड (HFL)

हिंदुस्तान फ्लूरोकार्बन लिमिटेड ही कंपनी रसायन आणि पेट्रो रसायन विभागाच्या अंतर्गत येणारी सरकारी कंपनी आहे. सध्या तोट्यात चाललेल्या या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती सारख्या योजनांच्या माध्यमातून योग्य तो लाभ दिला जाईल. यासाठी सरकार कंपनीला बिनव्याजी ७७.२० कोटी एवढी रक्कम देणार आहे. याची भरपाई कंपनीची जमीन आणि इतर संपत्ती विकून केली जाईल.

स्कूटर्स इंडिया

भारताला लम्ब्रेटा, विजय डिलस्क आणि विजय सुपर सारखे स्कुटर देणाऱ्या स्कूटर इंडिया लिमिटेडला केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १९८० मध्ये या कंपनीने आपली शेवटची लम्ब्रेटा स्कूटर बाजारात आणली होती. तेव्हापासून कंपनीचे सर्व प्लांट बंद होते.

भारत पंप्स आणि कम्प्रेसर्स लिमिटेड

ही एक लघु उद्योग असणारी कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय इलाहाबाद येथे असून येथे विविध प्रकारचे पंप्स उत्पादन केले जात होते.

हिंदुस्तान प्रीफैब

हिंदुस्तान प्रीफैब लिमिटेड (HPL) ही भारतातील एक जुनी सरकारी कंपनी आहे. भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान पाकिस्तानातून आलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९५३ मध्ये या कंपनीला हिंदुस्तान हाऊसिंग फॅक्टरी लिमिटेड असे नाव देण्यात आले होते. तर ९ मार्च १९७८ मध्ये कंपनीला हिंदुस्तान प्रीफैब लिमिटेड असे नाव देण्यात आले.

हिंदुस्तान न्यूजप्रिंट लिमिटेड

केरळ राज्याच्या वेल्लूर मध्ये ७ जून १९८३ रोजी ही कंपनी स्थापन्यात आली होती. १९९८ मध्ये ISO 9002 प्रमाणपत्र मिळवणारी ही देशातील प्रथम न्यूजप्रिंट उत्पादित करणारी कंपनी बनली होती. मात्र आता या कंपनीला टाळे लागलेले आहे.

कर्नाटक अँटीबायोटिक्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड (KPL)

१९८४ साली स्थापन झालेल्या केपीएलने अनेक जीवनावश्यक आणि महत्त्वाच्या औषधांची निर्मिती केली. तसेच औषधांची मार्केटिंगही चांगली केली होती. ISO प्रमाणपत्रासहीत केपीएलला देशात आणि विदेशात गुणवत्तेचा दर्जा आणि चोख सेवा देण्याच्या बाबतीत नावाजलेले आहे.