घरदेश-विदेशModi Govt : जुन्या घोषणा कागदावरच अन् नवनवीन घोषणांची ‘गॅरंटी’, ठाकरे गटाचा...

Modi Govt : जुन्या घोषणा कागदावरच अन् नवनवीन घोषणांची ‘गॅरंटी’, ठाकरे गटाचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : आजघडीला बेरोजगारी हा देशातील सर्वात गंभीर मुद्दा बनला आहे; पण मोदी सरकार या समस्येविषयी अवाक्षरही काढायला तयार नाही. महागाई कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे, याविषयी सरकार काही बोलत नाही. सरकारने दिलेली जुनी आश्वासने आणि जुन्या घोषणा अजून कागदावरच असताना नवनवीन घोषणांची ‘गॅरंटी’ दिली जात आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “मोदी-शहा महाराष्ट्राचे गुन्हेगार” संजय राऊतांची घणाघाती टीका

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून सरकार अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपामध्ये सामील करून घेत आहे. गेल्या दहा वर्षांत याच पद्धतीने भीती घालून सरकारने देशभरातील इतर राजकीय पक्षांच्या 411 आमदारांना भाजपामध्ये सामील करून घेतले आहे. मोदी सरकार देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक राज्यांतील विरोधी पक्षांची सरकारे उलथवून भाजपाने तेथे स्वतःची सरकारे स्थापन केली, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांतील काळ्या कारनाम्यांवर एक ‘काळी पत्रिका’च गुरुवारी प्रसिद्ध केली. अर्थात, या काळ्या पत्रिकेची खरी कळ काढली ती मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच. 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी 2014 पूर्वीच्या काँगेसच्या काळातील अर्थव्यवस्थेबाबत श्वेतपत्रिका काढली जाईल, अशी घोषणा केली होती. म्हणजे, दहा वर्षांत आपल्या सरकारने काय काम केले, याचा हिशेब देण्याऐवजी काँग्रेसच्या जुन्या राजवटीतील पोतड्या बाहेर काढू, असे मोदी सरकारने जाहीर केल्याचे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : “हिंमत असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करा”, घोसाळकरांच्या हत्येनंतर राऊतांचे आव्हान

बिगर भाजपाची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये ‘मनरेगा’च्या मजुरांचा निधीही केंद्राकडून दिला जात नाही, असे अनेक आरोप काँग्रेसने या काळ्या पत्रिकेच्या माध्यमातून केले आहेत. सत्तेच्या उन्मादात बेभान झालेले सरकार या काळ्या पत्रिकेतील एकाही मुद्द्यांवर बोलायला वा बाजू मांडायला तयार नाही. उलट ही काळी पत्रिका म्हणजे आमच्या कारभाराला दृष्ट लागू नये म्हणून काँग्रेसने लावलेली काळी तीटच आहे, अशी खिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडवली. अर्थात पंतप्रधानांनी अशी खिल्ली उडवली म्हणून काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या काळ्या पत्रिकेतील मुद्द्यांचे महत्त्व कमी होत नाही, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

सरकारला अशाप्रकारची श्वेतपत्रिका आणायचीच होती तर 2014मध्ये सत्तेवर आल्यानंतर का नाही आणली? उलट मोदी सरकारने श्वेतपत्रिकेचा मुद्दा काढून काँग्रेसला आयतीच संधी दिली आणि काँग्रेसनेही सरकारी श्वेतपत्रिकेच्या आधी सरकारविरुद्धच ‘काळी पत्रिका’ काढून एक पाऊल पुढे टाकले, हे बरेच झाले. एका अर्थाने ही काळी पत्रिका म्हणजे काँग्रेस पक्षाने मोदी सरकारच्या राजवटीवर दाखल केलेले आरोपपत्रच आहे, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – Dahisar Firing : आपल्याकडे ‘लॉ’ आहे, पण…; राज ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत मनसेचे सूचक ट्वीट

सरकारने आज कितीही टोलवाटोलवी केली तरी तीन महिन्यांवर आलेल्या निवडणुकीत देशातील जनता या गंभीर मुद्द्यांवर सरकारला जागोजागी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. दहा वर्षांच्या राजवटीत आपण काय दिवे लावले, हे खरे तर पंतप्रधान मोदी यांनी आज देशवासीयांना सांगण्याची गरज आहे. मात्र ते सोडून नेहरूंपासून मनमोहन सिंग यांच्यांपर्यंत काँग्रेसच्या काळात काय झाले, हाच जुना इतिहास मोदी उगाळत बसले आहेत. देशातील जनतेपासून वर्तमान लपवून भूतकाळात रमवण्याचे हे खेळ मोदी सरकारला आता फार खेळता येणार नाहीत, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -