मोदी तेरी कब्र खुदेगी, आरोपावर पंतप्रधानांचा पलटवार; म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात…

Meghalaya Assembly Election 2023 | "आज भारत यशाची नवीन शिखरे गाठत आहे. यामध्ये मेघालय भक्कम योगदान देत आहे. मेघालयचे योगदान पुढे घेत काम करायचे आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मेघालय आणि ईशान्येतील लोक कमळ आणि भाजपसोबत आहेत," असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

narendra modi

Meghalaya Assembly Election 2023 |“मेघालय मांगे, भाजपा सरकार’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिलाँगमध्ये जोरदार प्रचार केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, “जेव्हा मी मेघालयचा विचार करतो तेव्हा मला प्रतिभावान लोकांची, येथील परंपरेची, अद्भुत नैसर्गिक सौंदर्याची आठवण येते. मेघालयचे संगीत जिवंत आहे. येथील लोकांना फुटबॉलची आवड आहे. मेघालयच्या प्रत्येक कोपऱ्यात सर्जनशीलता आहे.”

काँग्रेसचं नाव न घेता ते पुढे म्हणाले की, “देशाने नाकारलेले, निराशेच्या गर्तेत बुडालेले काही लोक आजकाल जपमाळ घालतात आणि म्हणतात की मोदीजी, तुमची कबर खोदली जाईल. पण देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी, तुमचे कमळ फुलणार असं म्हटलं जातंय.”

“आज भारत यशाची नवीन शिखरे गाठत आहे. यामध्ये मेघालय भक्कम योगदान देत आहे. मेघालयचे योगदान पुढे घेत काम करायचे आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मेघालय आणि ईशान्येतील लोक कमळ आणि भाजपसोबत आहेत,” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


पंतप्रधान म्हणाले, मेघालयला ‘फॅमिली फर्स्ट’ ऐवजी ‘पीपल फर्स्ट’ सरकारची गरज आहे. मेघालय घराणेशाहीच्या राजकारणापासून मुक्त झाले पाहिजे. केवळ दिल्लीतच नाही तर मेघालयातही कौटुंबिक पक्षांनी आपली तिजोरी भरण्यासाठी मेघालयला एटीएम बनवले आहे.

पीएम मोदी म्हणाले, “मेघालयच्या हितांना कधीच प्राधान्य दिले गेले नाही… तुम्ही छोट्या-छोट्या मुद्द्यांवर विभागले गेलात. येथील राजकारणाने तुमचं खूप नुकसान केलंय. इथल्या तरुणांचं खूप नुकसान झालंय. आज मेघालयला फॅमिली फर्स्ट ऐवजी पीपल फर्स्ट असलेले सरकार हवे आहे. म्हणूनच आज ‘कमळाचे फूल’ हे मेघालयातील सामर्थ्य, शांतता आणि स्थिरतेचे समानार्थी शब्द बनले आहे.