पंतप्रधानांच्या स्वागत यात्रेला गुंडाची हजेरी, पीएमओ कार्यालय नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटकमधील स्वागत यात्रेला गुंडांनी हजेरी लावल्याने पंतप्रधान कार्यालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटकमधील स्वागत यात्रेला गुंडांनी हजेरी लावल्याने पंतप्रधान कार्यालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मोदी आणि गुंड रवी एकमेकांना अभिवादन करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत . यासंबंधी पीएमओ कार्यालयाने भाजपला थेट अहवालच सादर करण्यास सांगितला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर असताना त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात मंड्या येथे गुंड पीटर रवी याने मोदींचे स्वागत केले. यावरून राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. मोदींच्या स्वागत यादीत गुंड रवी कसा काय आला? त्याच्या नावाचा समावेश यादीत कोणी केला? ही यादीच कोणी तयार केली याची संपूर्ण माहितीचं पंतप्रधान कार्यालयाने प्रदेश भाजपकडून मागवली आहे. विशेष म्हणजे ही यादी मंड्या येथील भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच तयार केली आहे. यामुळे विरोधकांच्या हातात आयतचं कोलीत सापडलं आहे.

कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. मग त्यांना रवी हा गुंड आहे हे माहित नव्हते का, तसेच पंतप्रधान संबधित सर्व कार्यक्रमाची माहिती आधीच तेथील सरकारला मिळते मग त्यात मोदींचे स्वागत गुंड रवी कडून करण्यात येणार हे भाजपला कसे कळाले नाही असा सवाल करत विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप गुंडांना पक्षात प्रवेश देत असल्याचाही आरोप काँग्रेस वारंवार करत आहे. यामुळे भाजपची पुरती गोची झाली आहे.