हिंदू लग्नासाठी धर्मांतर करुन चूक करतायत – मोहन भागवत

Mohan Bhagwat

हिंदू केवळ लग्नासाठी धर्मांतर करत आहेत. जे हिंदू लग्न करण्यासाठी धर्म बदलत आहेत, ते मोठी चूक करत आहेत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. हे सर्व वैयक्तिक स्वार्थासाठी होत आहे. हिंदू कुटूंब आपल्या मुलांना हिंदू धर्माचा आणि त्यांच्या परंपरांचे संस्कार दिले जात नाही आहेत, असं मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत उत्तराखंडच्या हल्दवानी येथे आरएसएस कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना संबोधित करत होते. धर्मांतर कसं होत आहे? आपल्या देशातील मुले आणि मुली इतर धर्मांमध्ये कसे जात आहेत? हे सर्व वैयक्तिक स्वार्थासाठी हे सर्व सुरु आहे. लग्नासाठी जे धर्मांतर करतात ते चुकीचं आहे, असं मोहन भागवत म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी आपल्याला त्यांच्यावर घरीच संस्कार घरीच द्यायचे आहेत. आपल्या धर्माचा अभिमान बाळगा. आपल्या धर्मावर अभिमान वाटावा आणि आपल्या प्रार्थना आणि परंपरांबद्दल आदर वाटावा असे संस्कार मुलांना द्या. त्याबाबत मुलांनी प्रश्न उपस्थि केले तर त्यांना उत्तरे द्या, असं भागवत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केलं.

५० टक्के महिला कार्यक्रमांना हजर असाव्या

यावेळी भागवत यांनी भारतीय कौटुंबिक मूल्ये आणि त्यांचे जतन कसे करावे याबद्दल तपशीलवार माहिती दिली. आरएसएसच्या बहुतेक कार्यक्रमांमध्ये फक्त पुरुषच कसे दिसतात हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आरएसएसचा उद्देश हिंदू समाजाला एकत्र करणे आहे, परंतु जेव्हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा आपल्याला फक्त पुरुषच दिसतात. जर आपल्याला संपूर्ण समाज संघटित करायचा असेल तर किमान ५० टक्के महिला या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असायला हव्यात, असं मोहन भागवत म्हणाले.