मी स्वत: पाहिलंय, हे संपूर्ण प्रकरण खोटंय, सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर केजरीवालांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. यापूर्वी देखील ईडीने त्यांची चौकशी केली होती. तसेच ५ एप्रिल रोजी कारवाई करत ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली होती. जवळपास ४.८१ कोटी रूपयांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. दरम्यान या प्रकरणाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. मी स्वत: पाहिलंय, हे संपूर्ण प्रकरण खोटंय, असं मोठं वक्तव्य केजरीवाल यांनी केलं आहे.

हे प्रकरण पूर्णपणे खोटं आहे

हे प्रकरण पूर्णपणे खोटं आहे. आमचे सरकार पूर्णपणे प्रामाणिक सरकार आहे. हा अतिशय प्रामाणिक पक्ष आहे. आम्ही एका पैशाचाही भ्रष्टाचार सहन करत नाही. आत्ताच तुम्ही पंजाबमधील एका मंत्र्याची ऑडिओ रेकॉर्डिंग पाहिली आणि कोणतीही एजन्सी, विरोधी पक्ष किंवा मीडियाला त्याबद्दल माहिती नव्हती, आम्हाला हवं असतं तर ते प्रकरण आम्ही दाबू शकलो असतो, परंतु आम्ही स्वतः त्या मंत्र्यावर कारवाई केली आणि त्याला अटक केली, असं केजरीवाल म्हणाले.

मी सत्येंद्र जैन यांच्या खटल्याचा वैयक्तिक अभ्यास केला

पुढे केजरीवाल म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी दिल्लीतही असेच घडले होते. आमच्या एका मंत्र्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग मिळाले होते. मी त्यांना मंत्रालयातून बडतर्फ करून सीबीआयला पत्रही दिले. आम्ही कोणत्याही एजन्सीची वाट पाहत नाही आहोत, आम्ही स्वत: कारवाई करत आहोत, परंतु अनेक केंद्रीय एजन्सी कारवाई करतात हे देखील आम्ही पाहतो. तो राजकीय हेतूने प्रेरित आहे, म्हणून मी सत्येंद्र जैन यांच्या खटल्याचा वैयक्तिक अभ्यास केला आहे, हे पूर्णपणे खोटे प्रकरण आहे.

४.८१ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक

सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. सत्येंद्र जैन यांच्यावर २०१५-१६ दरम्यान मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. कोलकाता येथील बेनामी कंपन्यांमधील हवाला गुंतवणूक प्रकरणी त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे.


हेही वाचा : Rakesh Tikait: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक, पत्रकार परिषदेत जोरदार राडा, Video व्हायरल