येत्या पाच दिवसात महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये धडकणार पाऊस, हवामान खात्याकडून हाय अलर्ट

जूनच्या पहील्या आठवड्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये बरसल्यानंतर दडी मारून बसलेला मान्सून येत्या पाच दिवसात पुन्हा सक्रीय होणार आहे

जूनच्या पहील्या आठवड्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये बरसल्यानंतर दडी मारून बसलेला मान्सून येत्या पाच दिवसात पुन्हा सक्रीय होणार आहे. येत्या दोन दिवसात कर्नाटक, केरळ, गोव्यासह काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसणार असून बिहार-झारखंड येथे पावसाचा जोर वाढणार असल्याने हवामान खात्याने येथील यंत्रणांना अलर्ट (IMD) राहण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये पावसाने थैमान घातले असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान खात्यानेही याबाबत टि्वट केले असून कोकण, गोव्यासह कर्नाटक, बिहार, आसाम आणि केरळमध्ये येत्या पाच दिवसात जोरदार पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मध्ये महाराष्ट्रात २४ ते २६ जून, तर कर्नाटकमध्ये २४ ते २५ जून, गुजरातमध्ये २५ ते २६ जून या कालावधीत जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे म्हटले आहे.

बंगालच्या खाडीच्या पूर्वोत्तर आणि त्याला लागून असलेल्या पूर्वे भारतापर्यंत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असून २२ जून नंतर पश्चिम बंगालमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.