संसदेच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात सभापतींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कोणत्या विधेयकांवरून होणार गदारोळ

संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. एकूण 26 दिवसांच्या कालावधीत 18 बैठका असतील

monsoon session of parliament speaker om birla calls all party meeting today 24 new bills congress oppose agnipath inflation

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार म्हणजे 18 जुलैपासून सुरुवात होत आहे. ज्यामध्ये सुमारे 24 नवीन विधेयके मांडण्याचे प्रस्तावित आहे. संसदेच्या या अधिवेशनापूर्वी सभापतींनी सर्वपक्षीय नेत्यांची एक महत्वाची बैठक बोलावली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज दुपारी 4 वाजता संसदेच्या ग्रंथालय भवनात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत संसदेच्या अधिवेशनातील कामकाज आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित राहू शकतात.

24 नवे विधेयके होणार सादर

मोदी सरकार या पावसाळी अधिवेशनात अनेक नवीन विधेयके आणत आहे. एकूण 24 नवीन विधेयके संसदेत मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अधिवेशनात सर्व बिल पास होण्यासाठी प्रयत्न केले जातील. या विधेयकांमध्ये सहकार क्षेत्रातील सुधारणा आणि डिजिटल मीडियाशी संबंधित महत्त्वाच्या विधेयकांचाही समावेश आहे. मात्र काही विधेयके अशी आहेत ज्यांवरून संसदेत गदारोळ होऊ शकतो.

या विधेकयांवरून गदारोळ होण्याची शक्यता

मोदी सरकारच्या काळातील The Multi State Cooperative Societies ( Amendment ) Bill 2022 हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक मानले जाते आहे. सहकार मंत्रालयाची अतिरिक्त कमान हाती घेतल्यानंतरच अमित शहा यांनी त्यावर काम सुरू केले. एकापेक्षा जास्त राज्यात कार्यरत असलेल्या सुमारे 1500 सहकारी संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता आणणे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी संसाधने एकत्रित करण्याचे अधिकार देणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.

Press & Registration of Periodicals Bill 2022 हे देखील खूप महत्वाचे विधेयक मानले जात आहे, कारण या विधेयकाच्या माध्यमातून प्रथमच डिजिटल मीडियाला मीडियाचा एक भाग म्हणून समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 1867 चा जुना कायदा बदलून नवा कायदा करण्यासाठी नवीन विधेयक आणले आहे. या विधेयकात डिजिटल माध्यमांच्या नोंदणीसाठीही तरतूद करण्यात आली आहे.

महागाई आणि अग्निपथ योजनेवरून काँग्रेस करणार आंदोलन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारीत आहे. या अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, लष्कर भरतीची नवी ‘अग्निपथ’ योजना, तपास यंत्रणांचा कथित गैरवापर आणि सार्वजनिक हिताचे अनेक मुद्दे दोन्ही सभागृहात मांडले जाणार आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. पक्षाच्या पार्लमेंट अफेयर्स स्ट्रॅटेजिक ग्रुपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.

यंदाचे संसदीय अधिवेशन ठरणार खास 

संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. एकूण 26 दिवसांच्या कालावधीत 18 बैठका असतील. संसदेचे हे अधिवेशन विशेष ठरणार आहे, कारण 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे. दुसरीकडे उपाध्यक्षपदाची निवडणूक 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडणूक न झाल्यास त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे.


संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषण करण्यास बंदी; धार्मिक कृतींनाही मनाई