5 वर्षांत गुजरातमधील 40 हजारांहून अधिक महिला बेपत्ता, NCRBकडून अहवाल जारी

गुजरातमध्ये मागील 5 वर्षांत 40 हजारांहून अधिक महिला बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)कडून अहवाल जारी करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 2016 साली 7 हजार 105, 2017 साली 7 हजार 712, 2018 साली 9 हजार 246 आणि 2019 साली 9 हजार 268 इतक्या मुली आणि महिला बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच 2020 साली एकूण 8 हजार 290 महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

एकीकडे गुजरातमध्ये विकासाच्या मॉडेलचा संपूर्ण देशभरात प्रचार केला जातो. पण दुसरीकडे पाहिलं असता महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण मोठ्या संख्येनं वाढत आहे. गुजरातमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. या सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 2019-20 या वर्षी गुजरातमध्ये 4 हजार 722 महिला बेपत्ता झाल्या होत्या.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्याने एनसीआरबीची ही आकडेवारी अधिक गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. 2018 मध्ये, राज्य सरकारने कबुल केले की, गेल्या दोन वर्षांत राज्यातील 14 हजार 4 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. तथापि, यापैकी सुमारे 76 टक्के याच काळात सापडल्या देखील होत्या. त्या वर्षांत, दररोज 18 महिला बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. अहमदाबाद आणि सुरतमध्ये सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

मुलींच्या बेपत्ता होण्याला मानवी तस्करी कारणीभूत असल्याचे मत माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. राजन प्रियदर्शी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात दररोज 70 मुली बेपत्ता

राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2 हजार 200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. तर दररोज 70 मुली बेपत्ता होत आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाली असून ही आकडेवारी गंभीर आहे. तसेच बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण हे 18 ते 25 या वयोगटातील आहे.


हेही वाचा : धक्कादायक! राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ, दररोज 70 मुली