अयोध्यात घुसू देणारच नाही, बृजभूषण सिंहांचा पुन्हा राज ठाकरेंना इशारा

अयोध्या येथे आपण साधुसंताची बैठक बोलावली. यावेळी जवळपास एक लाख साधुसंत जमले. त्या बैठकीत जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत तो पर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू न देण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही बृजभूषण सिंह यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर भारतीयांची राज ठाकरे माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही असा इशारा काही दिवसांपूर्वीच दिला आहे. मात्र, राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम आहेत. मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तयारी देखील दौऱ्याची सुरू केली आहे.

राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना इशारा दिला आहे.  राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय त्यांना उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचे ठामपणे त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. बृजभूषण सिंह म्हणाले की,  राज ठाकरे उंदीर असून ते बिळात राहातात. त्या बिळातून ते आत्तापर्यंत बाहेर आले नाहीत. आता ते पहिल्यांदा बिळातून बाहेर आले आहेत. त्यामुळे मी त्यांना विरोध करत आहे.  त्यांना उत्तर प्रदेशच्या जमिनीवर घुसू देणार नाही म्हणजे घुसू देणारच नाही. ही तुमची राजकीय भेट आहे, धार्मिक भेट नाही, असेही त्यांनी राज ठाकरेंना सुनावले.

अयोध्या येथे आपण साधुसंताची बैठक बोलावली. यावेळी जवळपास एक लाख साधुसंत जमले. त्या बैठकीत जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत तो पर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू न देण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही बृजभूषण सिंह यांनी सांगितले. तुम्ही साधूसंतांना सांगा की धर्म, जात, प्रांताच्या आधारावर यापुढे आम्ही कुणामध्ये मतभेद करणार नाही.  यातून उत्तर भारतीयांसोबतच राज ठाकरेंचा देखील सन्मान होईल, असेही बृजभूषण सिंह म्हणाले.

देशाचे नेते व्हायचे असेल तर व्हा, पण आधी माफी माग. संताची नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागा. तेही नाही तर योगींची माफी मागा.  तेही करणार नसेल तर मग आमच्या जखमांवर मीठ चोळायला अयोध्येत येत आहात का? असा सवाल त्यांनी या वेळी केला. देशातील कोणताही नागरीक महाराष्ट्रात जातो, तेव्हा तो घाबरून तिथे राहतो. मी महाराष्ट्राची भूमी, महाराष्ट्राच्या लोकांना प्रणाम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो. माझे कुणाशीही वैर नाही. ही लढाई सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्ता परिवर्तनासाठी नसून. अन्यायाविरुद्ध आहे,  असं त्यांनी यावेळी म्हटले.