भयंकर! कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रस्त्यात टाकून रूग्णवाहिका निघून गेली!

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दिवसेंदिवस देशात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. या काळात कोरोना संबंधीत अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. दिल्लीतील एम्स रूग्णालयातील मृतदेह अदलाबबदलेच्या घटनेनंतर भोपाळमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये एका रूग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवताना त्याचा मृत्यू झाल्यामुळे अँब्युलन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह रस्त्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मृत पावलेला रुग्ण हा वीज पुरवठा कंपनीत कामाला होता. या रुग्णाला आधीच किडनीचा आजार होता. २३ जून पासून भोपाळ शहरातील पिपल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या रुग्णाला श्वसनाचा त्रास व्हायला लागल्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्या चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला. सोमवारी रात्री हा प्रकार घडला  आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना स्पष्टपणे आली आहे.

corona death

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरात कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार होत असलेल्या चिरायु हॉस्पिटलमध्ये या रूग्णाला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. चिरायु हॉस्पिटलची एक अँब्युलन्स या रुग्णाला घेऊन जाण्यासाठी पिपल हॉस्पिटलमध्ये आली. हॉस्पिटलमध्ये जात असताना या रुग्णाचा वाटेत मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या अँब्युलन्स कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलबाहेरील रस्त्यावर मृतदेह ठेवला आणि निघून गेले.

पिपल हॉस्पिटलचे व्यवस्थापक उद्य दीक्षित यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “चिरायु हॉस्पिटलची अँब्युलन्स रुग्णाला घेऊन गेल्यानंतर सुमारे ४० मिनीटांमध्येच परत आली. ज्यावेळी अँब्युलन्स परत आली, त्यावेळी सरकारी नियमानुसार आयसीयू सिल करण्यात आला होता आणि कर्मचारी निर्जंतुकीकरणाचं काम करत होते. अँब्युलन्सच्या कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचरची मागणी केली, पण त्यांना ते मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी रुग्णाला हॉस्पिटलजवळील रस्त्यावर सोडून माघारी जाणं पसंत केलं.

भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पिपल हॉस्पिटलच्या प्रशासनाला कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह रस्त्यावर पडून राहण्याबाबत अहवाल मागवला आहे.


हे ही वाचा – Video चिमुरड्यासह बोटींगला गेलेली अभिनेत्री बेपत्ता!