नवी दिल्ली : बांदा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गँगस्टर मुख्तार अंसारी याचे गुरुवारी संध्याकाळी ह्रदयविकाराच्या झटकाने निधन झाले. तुरुंगात तब्येत बिघडल्यानंतर त्याला राणी दुर्गावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. असे असले तरी मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी याने गंभीर आरोप केले आहे. (Mukhtar Ansari Gave Father Slow Poison Serious charge against Mukhtar Ansaris son)
हेही वाचा – Congress : ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्राप्तिकर विभागाचा झटका; 1700 कोटींचा दंड
माध्यमांशी बोलातना उमर अन्सारी म्हणाला की, आम्हीदेखील माणसं आहोत. वडिलांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जाईल, त्यातून सत्य समोर येईल. त्यामुळे आता मला काय वाटतं हे सांगून आता काही फायदा होणार नाही. माझ्या वडिलांना 15 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करत अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून थेट तुरुंगात नेण्यात आलं. माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, त्यांच्यावर विषप्रयोग केला जात होता. त्यांना स्लो पॉइझन दिलं जात आहे, असा दावा उमर अन्सारी याने केला आहे.
मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ सिबगतुल्लाह अन्सारीही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनावर आरोप करताना सिबगतुल्लाह याने आरोप केले की, हे सगळ कट रचून केलं गेलं आहे. तुरुंगात घृणास्पद घटना घडली आहे. मुख्तारचा मृतदेह पाहून तो आजारी होता असं वाटत नाही. त्याच्याकडे पाहून वाटतंय की तो झोपला आहे. परंतु हा कट रचणाऱ्यांना मला सांगायचं आहे की, अल्लाह हे सगळं पाहतो आहे. मुख्तार अजून मेला नाही तो इथेच आपल्यामध्ये आहे. माझी फक्त इतकीच इच्छा आहे की, न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि चौकशी करावी. कारण पोलीस प्रशासन सध्या केवळ टाईमपास करत आहे, असा आरोपही सिबगतुल्लाह याने केला आहे.
हेही वाचा – Ramdas Athawale : आठवले म्हणाले, माझ्या ‘या’ मागण्या भाजपकडून मान्य..!
मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
दरम्यान, यूपीच्या बांदा तुरुंगात बंद असलेला गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी 8.30 च्या सुमारास कारागृहात मुख्तारची प्रकृती खालावली. मुख्तार याने उलट्या होत असल्याची तक्रार केली. याची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल, एसपी अंकुर अग्रवाल पोलीस दलासह तुरुंगात पोहोचले. सुमारे 40 मिनिटे अधिकारी कारागृहातच होते. यानंतर मुख्तार अंसारीला रुग्णवाहिकेतून बेशुद्ध अवस्थेत राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन वॉर्डात आणण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयातील 9 डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले, मात्र याचदरम्यान त्याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास प्रशासनाने मुख्तारच्या मृत्यूची माहिती सार्वजनिक केली होती.