घर देश-विदेश मुलायमसिंह यादव व्हेंटिलेटरवर, पंतप्रधान मोदींनी अखिलेशना फोन करून केली चौकशी

मुलायमसिंह यादव व्हेंटिलेटरवर, पंतप्रधान मोदींनी अखिलेशना फोन करून केली चौकशी

Subscribe

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधून मुलायम सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन मोदींनी अखिलेश यादव यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुलायमसिंह यादव यांना 26 सप्टेंबरपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती रविवारी अधिकच खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले. संसर्ग संपूर्ण शरीरात पसरला असून त्यांची ऑक्सिजन पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर देखरेखीसाठी वैद्यकीय समिती नेमण्यात आली आहे.

- Advertisement -

रविवारी सायंकाळी मुलायमसिंह यांची प्रकृती सध्या स्थिर होती. डॉक्टरांनी सांगितले होते की, आता काळजी करण्यासारखे काही नाही. त्यांची दैनंदिन तपासणी देखील करण्यात आली. पण रात्री उशिरा त्यांची प्रकृती पुन्हा खालावली, असे समाजवादी पक्षाचे राकेश यादव यांनी सांगितले. पत्नी डिंपल आणि मुलगा अर्जुनसोबत अखिलेश यादव पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ते तासभर रुग्णालयात थांबले होते. अखिलेश यांच्यासह मुलायम यांचे बंधू प्रा. रामगोपालही तिथे होते.

इटावाच्या सैफई गावातून मुलायम सिंह यांचे निकटवर्तीय तसेच संपूर्ण कुटुंब दिल्लीत दाखल झाले आहेत.

- Advertisement -

मेदांता हॉस्पिटलच्या पीआरओने सांगितले की, युरिन इन्फेक्शनबरोबरच मुलायमसिंह यादव यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. मेदांता हॉस्पिटलने सर्व माहिती त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांना दिली असल्याचे रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून मुलायमसिंह यादव यांचे आजारपण सुरू आहे. यापूर्वी त्यांना अनेकदा मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच म्हणजे, 24 जून 2022 रोजी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे नियमित तपासणी व उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -