घरदेश-विदेशनेताजी होते राजकीय आखाड्यातील पैलवान; २५ वर्षांत बदलले सहा पक्ष

नेताजी होते राजकीय आखाड्यातील पैलवान; २५ वर्षांत बदलले सहा पक्ष

Subscribe

मुलायमसिंह यादव यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय आखाड्यातील पैलवान म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा थोडक्यात जीवनपरिचर जाणून घेऊयात.

उत्तर प्रदेश माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचं दीर्घ आजाराने आज निधन झालं. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजकीय आखाड्यातील पैलवान म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा थोडक्यात जीवनपरिचर जाणून घेऊयात.

२२ नोव्हेंबर १९३९ रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई गावात त्यांचा जन्म झाला. इटावा, फतेहबाद आणि आगरा अशा ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मैनपुरीच्या करहल येथील जैन इटंर कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. पाच भावंडांमध्ये मुलायमसिंह यादव दोन क्रमाकांचे भाऊ होते. करिअरच्या सुरुवातीला ते पैलवान होते. त्यांनी पैलवान व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, त्यांनी राजकारणातच आपला आखाडा तयार केला. मैनपुरी येथे एक कुस्तीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला नत्थूसिंह उपस्थित होते. हेच त्यांचे राजकारणातील गुरू ठरले.

- Advertisement -

हेही वाचा – सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचं निधन, मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नत्थूसिंहच्या पारंपारिक विधानसभा मतदारसंघ जसवंतनगर येथूनच मुलायमसिंह यादव यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. वयाच्या २८ वर्षी ते आमदार बनले. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी राजकारणात यशस्वी करिअर घडवलं.

- Advertisement -

सुरुवातीला त्यांनी संयुक्त सोशलिस्ट पक्षाच्या तिकिटावरून जसवंतनगर येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. १९६९ विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले. तर, १९७४ च्या निवडणुकीत मुलायमसिंह यादव पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.

राजकीय घोडदौड

१९८९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल पक्ष मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आला. ४२५ जागांपैकी २०८ जागा जनता दलाने मिळवल्या. काँग्रेस ९४ जागांवर थांबली. त्यावेळी मुलायमसिंह यादव जतना दलाकडून मुख्यमंत्री बनले. त्या निवडणुकीनंतर केंद्रातही जनता दलाची सत्ता आली होती. तेव्हा वी.पी.सिंह पंतप्रधान होते. नोव्हेंबर १९९० मध्ये ते सरकार कोसळलं. तेव्हा मुलायमसिंह यादव यांनी चंद्रशेखर यांच्या जनता दल (समाजवादी) पक्षात प्रवेश केला. जनता दलाने (संयुक्त) काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली आणि यादव यांनी आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची राखली. एप्रिल १९९१ मध्ये काँग्रेसने सरकारमधून आपला पाठिंबा काढून घेतला, तेव्हा मुलायमसिंह यादव यांचं सरकार पुन्हा कोसळलं. १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात मध्यावधी निवडणुका लागल्या तेव्हा मुलायमसिंह यादव यांच्या पक्षाला पराभव सहन कारावा लागला तर, भाजपा सत्तेवर आली.


२५ वर्षांत सहावेळा पक्षबदल

मुलायमसिंह यादव यांनी १९६७ मध्ये पहिल्यांदा संयुक्त सोशलिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवली. १९७४ मध्ये त्यांनी भारतीय क्रांती दलात प्रवेश केला. मग, १९७७ मध्ये जनता पक्षात ते सामील झाले. जनता पक्षाकडूनच ते पहिल्यांदा मंत्री बनले.

१९८० मध्ये त्यांनी जनता पक्ष (सेक्युलर)च्या तिकिटावरून विधानसभा निवडणूक लढवली. १९८५ मध्ये त्यांनी लोकदल पक्षात प्रवेश केला. तर, १९८९ मध्ये जनता दलाच्या तिकिटावरून विधानसभेवर पोहोचले. १९९० मध्ये जनता दलाचं सरकार कोसळल्यावर त्यांनी जनता दल (समाजवादी) पक्षात प्रवेश केला. तर, १९९१च्या मध्यावधी निवडणुकीत त्यांनी जनता पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढवली. त्यानंतर, १९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ४ ऑक्टोबर १९९२ मध्ये लखनऊच्या बेगम हजरत महल पार्कमध्ये मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची घोषणा केली.

२००४ रोजी ते मैनपुरीतून लोकसभा निवडणूक लढले. २०१४ मध्ये त्यांनी आजमगढ आणि मैनपुरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. महत्त्वाचं म्हणजे, दोन्ही मतदारसंघातून ते जिंकून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी यश संपादन केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -