घरदेश-विदेशMumbai 1993 serial blast : 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मोस्ट वाँटेड आरोपी...

Mumbai 1993 serial blast : 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला अखेर बेड्या

Subscribe

मात्र या स्फोटांचा सर्वात मोठा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम अजूनही तपास यंत्रणाच्या हाती लागत नाही.

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटात 257 जणांनी आपला जीव गमावला. तर सातशेपेक्षा अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या वाईट आठवणींचे घाव आजही मुंबईकरांच्या मनात कायम आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांकडून या स्फोटामागील मुख्य आरोपींचा शोध घेणे सुरु होते. अखेर अनेक देशांमधील शोध मोहिमेदरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे.

भारतीय तपास यंत्रणांनी 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला UAE मधून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अबू बकर असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून त्याला लवकरच UAE मधून भारतात आणले जाईल. 1993 मध्ये मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 713 लोक जखमी झाले होते.

- Advertisement -

तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. त्याने पाकिस्तानमध्ये शस्त्रे आणि स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते आणि मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेमध्ये वापरलेले आरडीएक्स मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्याचे काम केले होते. ही घटना घडवण्याची संपूर्ण योजना दाऊद इब्राहिमच्या दुबईतील निवासस्थानी राबविण्यात आली. गेल्या 29 वर्षांपासून अबू बकर संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानमध्ये लपून बसला होता.

अबू बकरला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती, परंतु त्यावेळी त्याने काही कागदपत्रे अशा प्रकारे सादर केली होती, त्यानंतर यूएई अधिकाऱ्यांना त्याला सोडावे लागले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय एजन्सी अबू बकरच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत आहेत. भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत समाविष्ट झाल्यानंतर जवळपास 29 वर्षांनंतर अबू बकरला UAE मधून परत आणल्यानंतर अखेर भारतात कायद्याला सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisement -

मुंबई बॉम्बस्फोटातील वाँटेड सलीम गाझीचा नुकताच झाला मृत्यू 

1993 च्या मोस्ट वॉन्टेड सीरियल बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी याचा काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील कराची येथे मृत्यू झाला होता. सलीम गाझी हा दाऊद टोळीचा सदस्य होता आणि तो छोटा शकीलचा जवळचा मानला जात होता. दाऊदसोबतही त्याचे खास नाते होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलीम गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याला उच्च रक्तदाब आणि इतर आजार होते. शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानात प्रशिक्षण 

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट दाऊद इब्राहिमच्या सूचनेवरून झाले. अनेक कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. स्फोटापूर्वी ज्यांची निवड झाली, त्यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवण्यात आले. या स्फोटात सहभागी अबू सालेम आणि फारुख टकला सारखे लोक पकडले गेले आहेत. मात्र या स्फोटांचा सर्वात मोठा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम अजूनही तपास यंत्रणाच्या हाती लागत नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -