नवी दिल्ली : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले. 26 नोव्हेंबर 2008 च्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली होती. या दहशतवादी हल्लाचा आजही विचार केला तरी मुंबईकरांच्या अंगावर काटे उभे राहतात. याच दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला आरोपी तहव्वुर राणा आता लवकरच भारतात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कारण या राणाने त्याला भारताकडे न सोपविण्यात येण्याबाबतची याचिका अमेरिकेतील कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. परंतु, त्याची ही याचिका आता कॅलिफर्निया न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे आता दहशतवादी तहव्वुर राणा याला लवकरच भारतात आणण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Mumbai 26/11 terrorist Tahawwur rana soon in India? California court denied the petition)
हेही वाचा – बैठकीतच दहीहंडी समन्वय समिती कोसळली; उरला आरोप-प्रत्यारोपांचा काला
पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यापारी असलेला तहव्वुर राणा याचा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर त्याला भारताकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी अमेरिकडे करण्यात आली होती. परंतु या विरोधात राणाने 2 ऑगस्टला कॅलिफोर्निया जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु कॅलिफोर्नियाचे युनायटेड स्टेट्स जिल्हा न्यायाधीश डेल एस फिशर यांनी राणाची याचिका फेटाळली. न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, तहव्वुर राणा याने दाखल केलेली हेबियस कॉर्पस याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. यानंतर राणाने न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देत नवव्या सर्किट कोर्टात याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर सुनावणी होत असताना राणा यांच्या बंदी प्रकरणी दोन महत्त्वाचे युक्तिवाद करण्यात आले. न्यायाधीश फिशर यांनी सांगितल्यानुसार, राणाला भीती आहे की भारत त्याच्यावर अशाच प्रकरणांमध्ये कारवाई करेल ज्यामध्ये अमेरिकेच्या न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले आहे. तर राणाने भारतात जे गुन्हे केलेले आहेत, त्याविरोधात त्याच्यावर खटले चालवले जाऊ शकतात, अशी भीती त्याला आहे.
न्यायाधीश फिशर यानी राणाची याचिका फेटाळून लावल्यानंतर या निर्णयाला राणाचे वकील पॅट्रिक ब्लेगन आणि जॉन डी. क्लाइन यांनी अमेरिकेच्या नवव्या सर्किट कोर्टात आव्हान दिले आहे. त्याच्या प्रत्यार्पणाला सुनावणी होईपर्यंत स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती ब्लेगेनने दुसऱ्या याचिकेमध्ये केली आहे. 14 ऑगस्ट रोजी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी योग्य सुनावणी होईपर्यंत अपील प्रलंबित ठेवण्यास सांगितले होते. राणाला भारताकडे सोपविल्यास त्याला कदाचित फाशीची शिक्षा देण्यात येईल, अशी भीती राणाच्या वकिलांना आहे.