आपण लांबचा प्रवास सुखकर आणि सुखद व्हावा यासाठी आपण लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीचे आरक्षण करतो आणि त्यादृष्टीने प्रवास करत असतो. रेल्वेमध्ये प्रावाशांसाठी जेवणाची सोय देखील केली जाते. मात्र गाडीत मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रवाशांच्या ताटालतेल काही पदार्थ वेगळे करून इतर प्रवाशांना जास्त भावाने विकण्याचा धंदा रेल्वेगाड्यांमध्ये काही वेटर आणि कॅटरर करत असल्याचे दिसून येत आहेत.
नवी मुंबईतील अनुज गुप्ता आणि त्यांचे कुटुंबीय ओडिशातील पुरी येथून मुंबईला परत येत असताना त्याना रेल्वेमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणाबाबत इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे इमेलने तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत रेल्वेमध्ये जेवण पुरविणाऱ्या कॅटररला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अनुज गुप्ता आणि त्यांचे कुटूंबीय सप्टेंबर २०२३ मध्ये चारधाम यात्रेसाठी गेले होते. यात्रेच्या समाप्तीनंतर मुंबईला परत येण्यासाठी २१ सप्टेंबर २०२३ रोजी पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक १२१४६) मधून एसी ३ टियर वातानुकूलित डब्यातून प्रवास सुरू केला. रेल्वेमध्ये एका व्हेज थाळीचे ऐंशी रूपये असताना गुप्ते यांच्या कुंटूबाला ते प्रवास करत असलेल्या ट्रेनमध्ये पँट्री कारवाला दीडशे रुपयांना एक जेवणाची थाळी विकत असल्याचे निदर्शनास आले. परंतु पँट्री कारचा व्यवस्थापक संतोष राठोड याला भेटून तक्रार केली असता मूळ ८० रुपयेप्रमाणे चार थाळी जेवन मिळाले.
IRCTC च्या मेन्युमध्ये एका व्हेज थाळीमध्ये दोन पराठे किंवा चार चपात्या, ८० ग्रॅम दही,१५० ग्रॅम साधा भात, १५० ग्रॅम घट्ट डाळ किंवा सांबर, लोणचे असे पदार्थ नमूद आहे. परंतु पँट्री कारमधून आलेल्या जेवणाच्या थाळीत दोनच चपात्या होत्या. डाळ पाण्याप्रमाणे अगदी पातळ होती. शिवाय थाळीमध्ये दही नव्हते. त्याबाबत पँट्री कारच्या वेटरला विचारले असता, ‘या गाडीत एवढेच जेवण असते. दही संपले आहे. डाळ पुरेशी येत नसल्याने डाळी पातळ आहे…’ अशी कारणे सांगण्यात आली. तसेच थोड्या वेळाने एक वेटर ३०-४० रुपयांप्रमाणे इतर प्रवाशांना सुट्टे दही विकत असल्याचे दिसून आले. हा उघड नियमांचा भंग असून सेवेत कुचराई करणे सरू असल्याचे गुप्त यांना दिसून आले. त्यांनी झालेल्या प्रकाराची इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे इमेलने तक्रार केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर IRCTC कडून या प्रकारणाची चौकशी करण्यात आली. या रेल्वेत जेवण पुरवणाऱ्या मेसर्स आर के असोसिएट्स अंड हॉटेलियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार कंपनीला कर्तव्यात कुचराई केल्याच्या कारणावरून पाच हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, रेल्वेमध्ये प्रवाशांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत केलेल्या तक्रारीची चौकशी केल्याबद्दल मी समाधानी असल्याचे गुप्त यांनी सांगितले.