रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता अडीच तासात पार करता येणार मुंबई-पुणे अंतर

Mumbai-Pune distance can be covered in two and a half hours due to Vande Bharat Semi High Speed Railway
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता अडीच तासात पार करता येणार मुंबई-पुणे अंतर

मुंबई-पुणे पहिली वंदे भारत सेमी हायस्पीड रेल्वे सुरू होणार आहे. या सेमी हायस्पीड रेल्वेमुळे मुंबई-पुणे अंतर केवळ अडीच तासात कापता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ही रेल्वेसेवा सुरु करण्याबाबत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, येत्या स्वातंत्र्यदिनापासून ही सेवा सुरु होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात 400 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणाक केली होती. त्यानुसार मुंबई- पुणे मार्गावर दोन सेमी हायस्पीड रेल्व सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई-पुणे मार्गावर सध्या डेक्कन क्वीन ही सर्वात जलद एक्सप्रेस आहे. या एक्सप्रेस गाडीला हे अंतर कापण्यासाठी 3 तास 10 मिनिटे वेळ लागतो. मात्र, सेमी हायस्पीड ट्रेन हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र, या गाडीचे तिकीट दर काय असतील याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

नाश्ता आणि जेवणाची सोय उपलब्ध –

वंदे भारत गाड्यांमध्ये GPS-आधारित प्रवासी माहिती, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित दरवाजे आणि व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट या सुविधा आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सहज बाहेर काढण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चार आपत्कालीन खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. ट्रेनमध्ये जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. तिकीटाच्या किमतीतच त्याच्या किमती समाविष्ट केल्या जातात. जर तुम्ही वाराणसी ते दिल्ली असा प्रवास केला तर तुम्हाला नाश्ता आणि जेवण ट्रेनमध्येच देण्यात येते.