महिलेने रस्त्यावर कचरा टाकला, पालिकेने तोच कचरा उचलून तिच्या घरात टाकला!

kakinada municipal corporation

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं जात असताना अनेक ठिकाणी घरांमधू कचरा थेट रस्त्यावर टाकला जात असल्याचं दिसून येत आहे. त्यातच अनेक ठिकाणी घरांमधून ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा केला जात असताना काही नागरिक कचरा थेट रस्त्यांवर फेकत असल्यामुळे संबंधित परिसरात कचरा साठल्याचं चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काही पालिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकमधल्या काकीनाडा महानगर पालकेने तर एक अजबच शिक्षा शोधून काढली आहे. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या घरांना पुन्हा त्याच कचऱ्याचं ‘रिटर्न गिफ्ट’ दिलं जाईल, असं या पालिकेचे आयुक्त स्वप्नील दिनकर यांनी स्पष्ट केलं आहे. एका महिलेच्या घरात तर त्यांनी कचरा टाकला देखील! त्यामुळे या महिलेसोबतच त्यांच्यासोबत असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील धक्का बसला!

गुरुवारी सकाळी स्वप्नील दिनकर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत राऊंडसाठी निघाले असता त्यांच्या समोरच एका महिलेने तिच्या घरातला कचरा बाहेर रस्त्यावर फेकला. हे पाहून स्वप्नील दिनकर यांनी त्या महिलेला जाब विचारला. हे करत असताना पालिकेचे कर्मचारी महिलेने फेकलेला कचरा उचलत होते. मात्र, महिला ऐकत नसल्याचं पाहून स्वप्नी दिनकर यांनी तोच कचरा उचलून थेट महिलेच्या घरात उलट फेकला. यामुळे उपस्थित सगळ्यांनाच धक्का बसला. याविषयी बोलताना दिनकर म्हणाले, ‘इथून पुढे पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या रहिवाशांना रिटर्न गिफ्ट देतील. त्यांनी जर रस्त्यावर कचरा फेकला, तर तोच कचरा त्यांच्या घरात उलट फेकला जाईल’.

काकीनाडा महानगर पालिकेने स्वच्छतेसाठी आधुनिक मॉडेल राबवलं आहे. यामध्ये पाच मोठे कॉम्पॅक्टर्स, १० छोटे कॉम्पॅक्टर्स, १४ ट्रॅक्टर, ३ ट्रीपर, २ जेसीबी आणि जवळपास ११०० पालिका कर्मचारी शहर स्वच्छतेसाठी काम करत आहेत. पालिका कर्मचारी शहरातल्या एकूण २९३ पॉकेट्समधून कचरा गोळा करतात. या प्रत्येक पॉकेटमध्ये २५० ते ३०० घरं आहेत. प्रत्येक पॉकेटमध्ये २ कर्मचारी घराघरात जाऊन कचरा गोळा करतात. सर्व कर्मचाऱ्यांकडे बारकोड रिडर्स देण्यात आले आहेत. त्याद्वारे ते बारकोड रीड करतात आणि नंतर कचरा गोळा करतात. याशिवाय प्रत्येक चौकात कचरा फेकायच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.