घर क्राइम कोर्टाच्या आवारात गुंडाची हत्या, लखनऊच्या केसरबाग न्यायालयातील घटना

कोर्टाच्या आवारात गुंडाची हत्या, लखनऊच्या केसरबाग न्यायालयातील घटना

Subscribe

लखनऊमधील केसरबाग कोर्टात गँगस्टर संजीव माहेश्वरी जीवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर वकिलाच्या वेशात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लखनऊमधील केसरबाग कोर्टात गँगस्टर संजीव माहेश्वरी जीवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोर वकिलाच्या वेशात आला होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. संजीव माहेश्वरी हे मुख्तार अन्सारीचे जवळचे होते. ते भाजप नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतील आरोपी असल्याचे सांगण्यात आले आहे. आज (ता. 07 जून) संजीवला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याचवेळी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. संजीव माहेश्वरी जीवा हा पश्चिम यूपीचा कुख्यात गुंड होता. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून पोलिसांनी हल्लेखोराला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले आहे. विजय यादव यांचा मुलगा श्यामा यादव (रा. केरकट जिल्हा जौनपूर) असे मारेकऱ्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

कोर्टातील वकिलांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेनंतर वकिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वकिलांकडून त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हल्लेखोराने सहा गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. तर याबाबत बोलताना एका वकिलाने सांगितले की, मी रोज इथे येत असतो. पण आज जे घडले ते लज्जास्पद आहे. या घटनेत एका मुलीला गोळी लागली आहे. न्यायालयात येण्यापूर्वी सगळ्यांची तपासणी होते, आमच्याकडे काही आहे की नाही याची तपासणी केली जाते. तरी देखील न्यायालयाच्या आवारात शस्त्रे येत असून ही भीतीदायक बाब आहे.

कोण होता गुंड संजीव जीवा?

- Advertisement -

संजीव माहेश्वरी जीवा हा शामली जिल्ह्यातील रहिवासी होता. 90च्या दशकाच्या सुरुवातीपासून त्याने गुन्हेगारीच्या विश्वात पाऊल ठेवले. त्याच्यावर 22 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तो बाहुबली मुख्तार अन्सारीच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीच्या काळात तो दवाखान्यात कंपाउंडर म्हणून काम करायचा. त्यानंतर नोकरीच्या वेळी त्याने दवाखान्याच्या संचालकाचे अपहरण केले होते. कोलकातामध्ये देखील त्याने एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून 2 कोटींची खंडणी मागितली होती. 10 मे 1997 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येप्रकरणी त्याचे नाव समोर आले होते. तो गेल्या अनेक वर्षांपासून कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. नुकतीच जिवाची मुझफ्फरनगरमधील सुमारे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जिल्हा प्रशासनाने जप्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण होते ब्रम्हदत्त द्विवेदी ?

ब्रम्हदत्त द्विवेदी हे भाजपचे मोठे नेते होते. ते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या जवळचे होते. प्रसिद्ध गेस्ट हाऊसच्या घटनेवेळी त्यांनी मायावतींना वाचवले. 10 फेब्रुवारी 1997 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. ज्यामध्ये संजीव महेश्वरीचे नाव घेण्यात आले.


- Advertisement -

हेही वाचा – आमदार झिशान सिद्दीकी यांनी पत्रकार स्वप्निल जाधवला दिलेली धमकी निषेधार्ह – अजित पवार

- Advertisment -