घरदेश-विदेशशेतकरी कुटुंबातील मुलगा ते सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीश

शेतकरी कुटुंबातील मुलगा ते सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीश

Subscribe

एन.व्ही.रमणांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

सर्वोच्च न्यायालयाचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमणा यांनी शनिवारी 24 एप्रिल रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमणा यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. सरन्यायाधीश रमणा हे 26 ऑगस्ट 2022 पर्यंत म्हणजेच पुढील 16 महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील. मागील महिन्यात माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमणा यांच्या नावाची सरन्यायाधीशपदासाठी शिफारस केली होती. शरद बोबडे हे शुक्रवारी 23 एप्रिल रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले होते. रमणा यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबतच उपराष्ट्रपती वंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कायदामंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. रमणा हे 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर रुजू होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

एन. व्ही. रमणा हे शरद बोबडे यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. नुथुलापटी वेंकट रमणा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 रोजी झाला होता. रमणा हे आंध्र प्रदेशातील शेतकरी कुटुंबातील आहेत. जून 2000 मध्ये त्यांची आंध्र प्रदेशच्या हायकोर्टात कायमस्वरुपी न्यायमूर्ती म्हणून निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केले. सुप्रीम कोर्टात 2014 पासून ते कार्यरत आहेत. सरन्यायाधीश रमणा यांनी 10 फेब्रुवारी 1983 मध्ये वकिलीचे काम सुरू केले.

- Advertisement -

चंद्रबाबू नायडू यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी आंध्र प्रदेश सरकारचे अ‍ॅडिशनल अ‍ॅडव्होकेट जनरल म्हणूनसुद्धा काम पाहिलेले आहे. ते विज्ञान आणि कायद्याचे पदवीधर आहेत. भारतात सरन्यायाधीशांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्तींच्या न्यायमूर्तींची शिफारस राष्ट्रपतींना करतात. राष्ट्रपती केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या सल्ल्याने सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -