Narendra Giri Death: नरेंद्र गिरींच्या मृत्यूचे कारण आले समोर

Mahant Narendra Giri

अखिल भारतीय अखाडा परिषद (ABAP) चे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. गळफास घेतल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे शविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालामुळे नरेंद्र गिरींचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याच्या थिअरीला पुष्टी मिळाली आहे. पण या मृत्यू प्रकरणाशी संबंधित एका व्हायरल व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्हिडिओत महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खाली पडलेला दिसतोय, पण त्याचवेळी पंखा सुरू असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आईजी केपी सिंह यांनी मठातील शिष्यांसोबत विचापूस करत असल्याचेही दिसत आहे. या १.४५ मिनिटांच्या व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूशी संबंधित या पावणे दोन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये महंत नरेंद्र गिरींचा मृतदेह सापडल्याच्या रूममधील चित्रीकरण करण्यात आले आहे. या रूममध्ये त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. व्हिडिओ दिसताच या व्हिडिओमध्ये महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह जमीनीवर पडलेला दिसतो आहे. तर मृतदेहाच्या शेजारीच एक सुसाईड नोटही आढळून आली आहे. नरेंद्र गिरींचे उत्तराधिकारी असलेले बलबीरी गिरी हेदेखील व्हिडिओत दिसून आले आहेत. व्हिडिओच्या आणखी एका फ्रेममध्ये एक फोटोग्राफर आणि एक पोलिस दिसून आला आहे. त्यानंतर या व्हिडिओचा कॅमेरा रूममध्ये बिछाना आणि वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फोटोंवर तसेच प्रमाणपत्रांवर फिरतो. पण त्यानंतरच्या फ्रेममध्ये पंखा सुरू असताना व्हिडिओत दिसून आला आहे. याच पंख्याला नॉयलॉनच्या रश्शीने बांधून नरेंद्र गिरींनी गळफास घेतला असावा अशी थिअरी याआधी मांडण्यात आली आहे. या रूममध्ये आलेले आयजी केपी सिंह यांनी शिष्यांनाही पंखा सुरू असल्याबाबत विचारपूस केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पंखा सुरू होता की कुणी सुरू केला अशीही चौकशी करताना ते व्हिडिओत दिसले. पण त्यांच्या प्रश्नाला बगल देत शिष्यांनी भलतीच उत्तरे दिल्याचे दिसून आले आहे.

मंहत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खाली उतरवल्यानंतर त्या नॉयलॉनच्या रश्शीचे तीन तुकडे आढळले आहेत. त्यामुळे मृतदेह खाली उतरवल्यानंतर तीन हिश्शात रश्शी का कापली असावी असाही तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. कारण रश्शी कापून एखादा मृतदेह खाली उतरवल्यानंतर तो गळफास गाठ काढून सोडवण्यात येतो अशी कामाची पद्धत आहे. पण रश्शीचे तुकडे केल्यानेच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रश्शीचा एक हिस्सा हा पोलिसांकडून गळ्यातच ठेवण्यात येतो अशी पंचनाम्याची पद्धत आहे. पण त्या रश्शीचे तीन तुकडे आढळून आले आहेत हे विशेष.

नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पाच डॉक्टरांच्या समुहाने प्रयागराज येथील एसआरएन हॉस्पिटलमध्ये केले. ही संपुर्ण प्रक्रिया व्हिडिओग्राफ करण्यात आली आहे. शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचेही शवविच्छेदना दरम्यान दिसून आले आहे. शवविच्छेदन अहवालात नरेंद्र गिरी यांच्या गळ्याभोवती व्ही आकाराची खूण गळफास घेतल्याने तयार झाल्याचे दिसून आले आहे. त्यांचा विसेराही जपून ठेवण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याचा वापर होऊ शकतो.

सीबीआय चौकशीची मागणी

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूमागील कारणाचा अद्यापही उलगडा झालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारने केली आहे.
संशयास्पद मृत्यूमुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे वाटत असले तरीही उत्तर प्रदेश पोलीस सर्व बाजूने तपास करताहेत. याचदरम्यान, महंत गिरी यांच्या मृत्यूमागे संपत्तीचा वाद असल्याचं कारण असून, त्यांना व्हिडीओच्या माध्यमातून कोणीतरी ब्लॅकमेल करत असल्याचेही समोर आले आहे.


हेही वाचा – महंत नरेंद्र गिरी आत्महत्या प्रकरण : यूपी सरकारने केली CBI चौकशीची मागणी