नवी दिल्ली : तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील डोमलापेंटा येथे एसएलबीसी बोगदा कोसळून दुर्घटना घडली आहे. या बोगद्याखाली एका वरिष्ठ अभियंत्यासह आठ कामगार अडकले आहेत. लष्कर आणि एनडीआरएफकडून बचावकार्य राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेची माहिती समजल्यावर त्यांनी तत्काळ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. तसेच बचाव कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. (Narendra Modi assures Telangana Chief Minister Revanth Reddy of help in rescuing workers trapped in tunnel)
जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कालव्याच्या (एसएलबीसी) बांधकामाधीन भागात आज अचानक पाणी आणि चिखलाचा पूर आल्याने बोगदा कोसळला. या अपघातात प्रकल्प अभियंते, साइट अभियंत्यांसह 8 कामगार अडकले आहेत. बोगदा दुर्घटनेमुळे सुमारे 8 किलोमीटर क्षेत्रावरील उत्खनन स्थळाचे नुकसान झाले. बोगद्याच्या बोअरिंगच्या कामात सहभागी असलेल्या जेपी असोसिएट्स आणि रॉबिन कंपनीने सांगितले की, सकाळी 8 वाजता काम सुरू झाल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांनी ही घटना घडली.
हेही वाचा – Shaktikanta Das : शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती
एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रकल्प अभियंते, साइट अभियंत्यांसह काही कामगार कामासाठी आत गेले असताना बोगद्याच्या 12-13 किलोमीटर आतील एका भागाचे छत कोसळल्याने ही घटना घडली. यानंतर तेलंगणा मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये मृतांची संख्या उघड केलेली नाही. परंतु काही कामगार जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी संवाद साधताना म्हटले की, कोणत्याही परिस्थितीत बचाव कार्य सुरळीत आणि जलद गतीने पार पाडले पाहिजे, जेणेकरून अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढता येईल.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले शोकसंवेदना
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, राज्याचे पाटबंधारे मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी, सिंचन बाबींवरील सरकारी सल्लागार आदित्यनाथ दास आणि इतर पाटबंधारे अधिकारी एका विशेष हेलिकॉप्टरने घटनास्थळी रवाना झाले आहेत. यानंतर तेलंगणाचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी एसएलबीसी बोगदा अपघाताच्या ठिकाणी पोहोचून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
हेही वाचा – New Corona Virus : चीनमध्ये आढळला नवा कोरोना; जनावरांमधून माणसांना होतोय संसर्ग; वाचा सविस्तर