नवी दिल्ली : अमेरिकेत बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेल्या भारतीय नागरिकांना तुकडी – तुकडीने भारतात पाठवण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतून 100 हून अधिक बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आले आहे. याप्रकरणी लोकसभा-राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. तसेच संसदेच्या परिसरात काँग्रेस, समाजवादी पक्ष (सपा) आणि इतर काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निदर्शन देखील केले. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे. (Narendra Modi to visit US amid deportation of illegal Indians)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स आणि त्यानंतर अमेरिका असे दोन महत्त्वाचे दौरे करणार आहेत. मोदी 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देतील आणि त्यानंतर लगेचच 12 फेब्रुवारीला अमेरिकेला जातील. या भेटीदरम्यान, भारत आणि या दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर चर्चा होईल. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज पत्रकार परिषदेत मोदींच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाचे 47 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.
विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 10 ते 12 फेब्रुवारी 2025 दरम्यान फ्रान्सचा अधिकृत दौरा करणार आहेत. या काळात ते फ्रान्सने आयोजित केलेल्या “आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) अॅक्शन समिट” मध्ये सहभागी होतील. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन या शिखर परिषदेचे सहअध्यक्ष असतील. पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पॅरिसमध्ये पोहोचतील, जिथे ते एलिसी पॅलेसमध्ये राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणाला उपस्थित राहतील. या विशेष कार्यक्रमात तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे सीईओ आणि इतर प्रतिष्ठित पाहुणे देखील उपस्थित राहतील.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे दोघे 11 फेब्रुवारी रोजी संयुक्तपणे एआय अॅक्शन समिटचे अध्यक्षपद भूषवतील. जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव आणि त्याच्या संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी हे आयोजन केले आहे. अशी पहिली परिषद 2023 मध्ये यूकेमध्ये आणि दुसरी 2024 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाली आहे, अशी माहिती मिस्त्री यांनी दिली.
फ्रान्सच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदी 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी अधिकृत अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. ट्रम्प प्रशासनाने पदभार स्वीकारल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत अमेरिकेला भेट देण्यासाठी आमंत्रित होणाऱ्या पहिल्या काही जागतिक नेत्यांमध्ये मोदी आहेत. मोदींना मिळालेले निमंत्रण भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व प्रतिबिंबित करते आणि अमेरिकन राजकारणात द्विपक्षीय समर्थन देखील प्रतिबिंबित करते, असे विक्रम मिस्री यांनी सांगितले.
हेही वाचा – ACB At Kejriwal Home : निकालापूर्वीच दिल्लीत मोठ्या घडामोडी, केजरीवालांच्या घरी एसीबीचे अधिकारी
100 हून अधिक बेकायदेशीर भारतीयांना पाठवले मायदेशी
अमेरिकेच्या विविध राज्यांमधून 104 बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान 5 फेब्रुवारी रोजी अमृतसरला पोहोचले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या कारवाईचा भाग म्हणून हद्दपार केलेल्या भारतीयांची पहिला तुकडी मायदेशात आली आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी 33, पंजाबमधील 30, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 3 आणि चंदीगडमधील दोघांचा समावेश आहे. अमेरिकेकडून हद्दपारीची कारवाई सुरू असतानाच मोदी दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरित झालेल्या भारतीयांना दिलासा मिळणार का? हे पाहावे लागेल.