भूकंप झालाच नाही !

लोकसभेतील शेवटच्या भाषणात पंतप्रधानांची टीका

PM-Modi-Lok-Sabha

भूकंप होईल असे ऐकायला मिळत होते. मात्र, भूकंप झालाच नाही. विमानेही उडवण्यात आली. मात्र, लोकशाहीची मर्यादा एवढी उंच आहे की, कोणतेही विमान त्याहून वर पोहोचू शकले नाही,अशी टीका करतानाच पूर्ण बहुमत असणारे सरकार ही आमची ओळख आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केले.

बुधवारी १६ व्या लोकसभेच्या अखेरच्या सत्राचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी सत्रासाठी लोकसभेत येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा संसदेच्या पायर्‍यांवर डोके ठेऊन नमस्कार केला. त्यानंतर लोकसभेतील भाषणात त्यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, आमच्या कार्यकाळात २१९ विधेयके आणण्यात आली. त्यातील २०३ विधेयके पारित झाली. नोटाबंदी, जीएसटीसारखे मोठे निर्णय झाले. आर्थिक आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाले. आम्ही काही कठोर निर्णय घेतले. ते गरजेचे होते. त्याचे परिणाम येणार्‍या काळात दिसतील.

गळाभेट आणि गळ्यात पडण्याचा फरक कळला
2014 साली मी पहिल्यांदा खासदार झालो. त्यापूर्वी मला लोकसभेतल्या गल्ल्या, दरवाजे आणि नियमांची माहिती नव्हती. या लोकसभेत मला खूप काही शिकता आले. लोकसभेत पहिल्यांदाच आल्यानंतर गळाभेट आणि गळ्यात पडणं यात काय फरक असतो, ते मला समजलं.

मी पहिल्यांदाच पाहिलं की, सभागृहात डोळे मारले जातात. मी ऐकलं होतं की भूकंप येतो. परंतु कोणताही भूकंप आलेला नाही. बर्‍याचदा विमाने उडवली गेली, परंतु लोकशाहीची मर्यादा आणि उंची एवढी मोठी आहे की, विमानेही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचा उल्लेख टाळून केली.

जिंकण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा
खासदारांचे वेतन वाढविण्याचे काम खासदारांकडेच होते. त्यामुळे वेतनवाढीनंतर दरवेळी देशातून आणि परदेशांतून टीका होत होती. मात्र, आता प्रक्रिया बदलण्यात आली आहे. देशात कायद्यांचे एक जंगल झाले होते. या सभागृहाने १४०० कायदे संपवले. २०१४ ला ३० वर्षांनी एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले.पूर्ण बहुमत असलेल्या पक्षाच्या पंतप्रधानाला देशात आणि जगात निर्णय घेताना सोपे होते, हे या सभागृहाने पाहिले.जिंकण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. देश आज आत्मविश्वासने उभा आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

भारत सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणा पुढे म्हणाले की, भारत ही पाच ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. भारत आज जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला आहे. जागतिक तापमानवाढीविरोधात भारताने मोठी लढाई लढली आहे.

भारताची प्रतिमा उजळली
गेल्या पाच वर्षांत भारताने मानवतेचे मूल्य जपले आहेत. त्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. नेपाळ, मालदीव, बांगला देशाला आम्ही मानवतेच्यादृष्टीने मदत केली. त्यामुळे जगासमोर आपली प्रतिमा उजळवली. भाजप सरकारच्या कार्यकाळात आम्ही संसदेत संविधान दिवस साजरा केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १५० वी जयंती साजरी केली. योगला आंतरराष्ट्रीय गौरव प्राप्त झाला, असा उल्लेख मोदी यांनी आपल्या भाषणात केला.