Imran Khan : पाकिस्तान दूतावासाचे ट्विटर हँडल हॅक; कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल चिंताग्रस्त मेसेज व्हायरल

ट्विटरवर पाकिस्तानी दूतावासाच्या सर्बिया हँडलवरून ट्विट केलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती पाकिस्तानी सरकारला ट्रोल करताना दिसत आहे

पंतप्रधान इमरान खान यांचा नवा पाकिस्तान दिवसांदिवस मागे चालला आहे. तिकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही सरकारकडे पैसे नाहीत. अशी दयनीय स्थिती पाकिस्तानची झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने पाकिस्तानातील एका सरकारी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पाकिस्तानच्या स्थितीचा अंदाज यावरून लावता येईल की त्याच्यांकडे आवश्यक खर्चासाठी देखील पैसे नाहीत. ट्विटरवर पाकिस्तानी दूतावासाच्या सर्बिया हँडलवरून ट्विट केलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती पाकिस्तानी सरकारला ट्रोल करताना दिसत आहे. त्या व्यक्तीने गाण्याच्या माध्यमातून सरकारचे अपयश सांगताना पंतप्रधान इमरान खान यांची देखील खूप थट्टा केली.

लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तानच्या सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना २५ ऑगस्टला निर्देश दिले होते की सोशल मीडियापासून लांब रहावे. यामागील हेतू म्हणजे अधिकृत माहिती आणि कागदपत्रे लीक होऊ नयेत असा आहे असे सांगण्यात आले होते. मात्र आता इमरान खान यांच्या या निर्णयामागे काही वेगळेच कारण असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान सरकारचा खोटेपणा उघड झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने दावा केला आहे की सर्बियातील पाकिस्तानी दूतावासाची सर्व सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आली होती. त्यांनी म्हंटले की, “सर्बियातील पाकिस्तानी दूतावासाची सर्व ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आली आहेत. या अकाउंटवर पोस्ट केले जात असलेले मेसेज सर्बिया पाकिस्तान दूतावासातील नाही आहेत”.

पाकिस्तानच्या इमरान खान यांच्या सरकारमध्ये महागाईने ७० वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. तूप, तेल, साखर, मैदा, मांस यांच्या किमती ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्या असताना अन्नधान्याच्या किमती दुपटीने वाढल्याची स्थिती आहे. वाढत्या महागाईमुळे जनता हैराण झाली आहे तर पाकिस्तानी रुपयाचेही मूल्यही सतत घसरत आहे.

पाकिस्तानवर वाढते कर्ज

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात देशाला पूर्णपणे कर्जाच्या ओझ्याखाली डुबवले आहे. कर्ज फेडणे तर लांबच पण कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पाकिस्तान सरकारकडे पैसे नाहीत. अशी आर्थिक कोंडी झाली आहे. चीनसोबतच पाकिस्तानने सौदी अरेबिया, यूएई, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडून लाखो कोटींचे कर्ज घेतले आहे. पाकिस्तानवर आताच्या घडीला ५० हजार अब्जांहून अधिक कर्ज आहे.


हे ही वाचा: http://प्रबोधनकार क्रीडा संकुलातर्फे पार पडला मल्लखांब स्पर्धांचा थरार; विविध जिल्ह्यातील २८ संघाचा सहभाग