National Unity Day 2021: सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने का साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिवस?

national unity day 2021 in india rashtriya ekta diwas why is it celebrated on vallabhbhai patel birth anniversary
National Unity Day 2021: सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने का साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिवस?

लोहपुरुष, देशाचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४५वी जयंती. दरवर्षी हा दिवस नॅशनल युनिटी डे म्हणजेच राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील ५६० राजघराण्यांच्या संस्थांना एकत्र आणण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची महत्त्वाची भूमिका होती. या संस्थानिकांशी संवाद साधून, त्यांच्याशी वाटाघाटी करून स्वतंत्र भारताचे नवे नातेसंबंध प्रस्थापित करण्याचे मोठे काम सरदार पटेल यांनी केले. राष्ट्राला एकत्र आणण्यासाठी आणि जोडण्यासाठी पटेल यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्याकरिता राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.

सरदार पटेल यांनी त्या काळात अगदी २४ तास, अखंड भारत निर्मितीसाठी कार्यरत राहिले, त्यामुळेच आपल्याला आजचा एकत्रित भारताचा नकाशा पहायला मिळतो आहे. त्यांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे त्यांना भारताचे लोहपुरुष असे संबोधले जाते. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३१ ऑक्टोबरला कार्यक्रम आयोजित केले जातात. २०१४ साली मोदी सरकारने ३१ ऑक्टोबर या दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहून पटेल यांच्या भव्य पुतळ्याला फुलं अर्पण करून त्यांना अभिवादन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G20 परिषदेच्या निमित्ताने दोन दिवसीस रोम दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित केले.

२०१८ पटेल यांच्या जयंती दिवशी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या या पुतळ्याचे काम २०१३ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते. या पुतळ्यासाठी २,९८९ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा मानला जातो. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे.